Breaking News
पनवेल : नववर्ष स्वागत शोभायात्रेचे यंदाचे रौप्य महोत्सव साजरे करत असताना पनवेलकरांनी नारीशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने यंदाच्या शोभायात्रेवर मोठ्या प्रमाणात नारीशक्तीचा प्रभाव दिसला. सकाळी सात वाजता शहरातील वीर सावरकर चौकातून निघालेली शोभायात्रेमध्ये बालिकांसह महिलांनी नेतृत्व केले. रामाच्या रथाने शोभायात्रेची सुरुवात झाली. पारंपारीक वेशभुषेमधील तरुण मुले, मुली, महिला यात्रेत लक्षवेधक ठरले.
बालिकांनी तलवार आणि दांडपट्टा फिरविण्याच्या नमुनेबाजीने उपस्थित पनवेलकरांची मने जिंकली. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेलकरांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. सिंधुदुर्ग जिल्हाहितवर्धक संघ, वनवासी कल्याण आश्रम, हिमालय अध्यात्म, महिला वकिल संघटना अशा विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सामाजिक विविध विषयांवर जनजागृतीचे फलक हाती घेतले होते. विरुपाक्ष मंदीराजवळ शोभायात्रेच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. महिला वकिल दुचाकीस्वारी यात्रेत सामिल झाल्या होत्या. ढोलताशांचा आवाज पनवेलमधील मुख्य रस्त्यावर घुमत होता. पनवेलकरांची बुधवारची गुढीपाडव्याची पहाट ढोलताशांच्या स्वरानेच सूरु झाली. शहरातील मुख्य चौकांमध्ये भगव्या पताक्यांनी रस्ते सजविण्यात आले होते. उंच काठीवर भगवा झेंडा फडकवून त्या झेंडा काठीचे वेगवेगळे नृत्याचे प्रकार यावेळी तरुणांकडून केल्या जात होत्या. मागील दोन वर्षे करोनासाथरोगामुळे शोभायात्रेवर निर्बंध होते. यंदाच्या शोभायात्रेतील सर्वच वयोगटातील व्यक्तींचा उत्साह शिगेला पोहचलेला दिसला. शोभायात्रेत सामिल झालेल्यांना गोड खाद्य पदार्थ वाटप करण्यात आली. अनेकांनी जिलेबी, पेढे यांचे वाटप यात्रेकरूंना केले. बुधवारी सकाळी पनवेलमधील असंख्य युवावर्ग पारंपारीक वेशभुषा परिधान करुन वडाळे तलावाच्या काठावर आपले सेल्फी छायाचित्र काढण्याकडे कल पाहायला मिळाला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ नागरिक मंडळ उरणच्या माध्यमातून उरण शहरात पेन्शनर्स पार्क,गणपती चौक,विमला तलाव, एन आय हायस्कूल मार्गे पेन्शनर्स पार्क असे शोभायात्रा काढून नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत पुरुषांसोबत महिला वर्गही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपस्थित सर्व मान्यवर विविध भारतीय वेशभूषा परिधान करून आले होते. उरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था यांच्यातर्फे पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai