Breaking News
राज्यपाल रमेश बैस यांचे विद्यापीठच्या मुख्य वास्तुच्या भूमीपुजन कार्यक्रमावेळी प्रतिपादन
पनवेल ः सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे कौशल्य विकासाची संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगत कौशल्य विद्यापीठ फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, भारत देशातीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक आदर्श विद्यापीठ असेल, असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठच्या मुख्य वास्तुचा भूमीपूजन समारंभ पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात 27 मार्च रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते संपन्न झाला. 15 जुलै 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मोहिमेची घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी या मोहिमेंतर्गत संपूर्ण भारतातील चाळीस कोटी लोकांना कुशल बनविण्याचे वचन दिले आहे. याचाच एक भाग म्हणून येथे कौशल्य विद्यापीठाच्या मुख्य वास्तूचा भूमीपूजन समारंभ दिमाखात संपन्न होत आहे. सदरी बाब महाराष्ट्र राज्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले. सदर योजनेचा मुख्य उद्देश अशा लोकांना सक्षम करणे आहे. ज्यांना खरोखर त्यांचे जीवन बदलायचे आहे परंतु त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता आहे आणि त्या अभावामुळे ते गरीब जीवन जगत आहेत, असे राज्यपाल बैस म्हणाले. भारतीय शिक्षण प्रणाली तल्लख बुध्दी असलेली पिढी निर्माण करीत आहे. परंतु, त्यात विशिष्ट नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव आहे. महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून बाहेर पडणारी प्रतिभा आणि त्यांची क्षमता आणि रोजगारक्षम कौशल्यांच्या दर्जाच्या बाबतीत त्यांची योग्यता यामध्ये खूप अंतर आहे.
इंग्रजी भाषिक लोकसंख्येच्या या भागामध्ये राष्ट्र आणि संपूर्ण जगाच्या कौशल्याच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे. गरज आहे ती अचूक आणि पुरेशा कौशल्य विकासाची आणि प्रशिक्षणाची. सरकारने सुरु केलेल्या स्किल इंडिया मिशनद्वारे कौशल्य प्रदान करुन रोजगारासाठी कुशल कार्यशक्ती निर्माण करुन समस्येवर तोडगा काढण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. तरुणांना कौशल्य प्राप्त करण्यासाठी शिक्षणातील व्यावसायिकीकरणाला महत्व आहे. बहुसंख्य उपेक्षित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी निरक्षरता समस्या असू शकते. परंतु, महिलांना कौशल्य प्रशिक्षण देताना कौटुंबिक समस्या आणि सामाजिक अडचणींचाही सामना करावा लागतो.
जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार सुसंगत असलेल्या अशा कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कौशल्य प्रशिक्षण सुविधांचा विस्तार एकमेव आव्हान नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी कौशल्याचा दर्जा वाढविणे हेदेखील एक आव्हान आहे, असे राज्यपाल बैस म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai