Breaking News
पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा
पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळाकडून डोलघर गाव आणि भोकरावाडी आदिवासी वाडीला दुय्यम वागणूक मिळत असल्याने डोलघर गाव आणि वाढीचा विकास खुंटला असल्याचा आरोप करीत ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळामधून मौजे डोलघर व भोकरवाडी आदिवासी विभक्त करून स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी या मुख्य मागणीसाठी येथील ग्रामस्थांनी मोर्चा काढत पनवेल प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ विशेषतः महिलांची या मोर्चात सहभाग होता.
डोलघर गावासाठी सर्वे नंबर 82/1 मध्ये गावठाण विस्तार करण्यात यावा व तलाठी सजा डोलघर आणि कर्नाळा हद्दीतील गहाळ केलेले सर्वे नं. 217 चा सातबारा, फेरफार व इतर संबंधित दस्तावेज देण्यात यावे या मागण्यांसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ शेकडो कोळी बांधवांनी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रांत कार्यालयाचे प्रतिनिधी तहसीलदार एस जाधव ,पनवेल तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संभाजी शेलार, सहाय्यक गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक आणि मोर्चेकरांच्या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करून पुढील दहा दिवसात याबाबत लेखी कळविण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार शेलार यांनी सांगितले. दरम्यान महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ इंगळे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. विनायक शेडगे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील,स्मिता रसाळ, शैलेश कोंडसकर, सचिन पाटील, उरण सामाजिक संस्थेचे प्रा. राजेंद्र मढवी, आदींनी मोर्चेकऱ्यांना पाठिंबा दिला. पुढील पंधरा दिवसात आमच्या मागण्यांवर ठोस कारवाई न झाल्यास डोलघरच्या महिला पनवेल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घालतील आणि पुरुष पनवेल प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसतील असा इशारा मोर्चेकऱ्यांच्यावतीने संतोष ठाकुर यांनी दिला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai