Breaking News
उरण ः प्रशासन शेवा कोळीवाडा गावातील जेएनपीटी प्रकल्प विस्थापित 86 शेतकरी व 170 बिगर शेतकरी 256 कुटुंबाचे शासनाच्या मापदंडानुसार पुनर्वसन करत नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी 15 एप्रिलला पुन्हा जेएनपीटीची जहाजे रोखून सामुहिक मासेमारी करुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेवा कोळीवाडा गावातील विस्थापितांनी शेवा कोळीवाडा गावात रहायला जाण्याचा निर्णय घेऊन 08 जानेवारी 2023 पासून शेवा कोळीवाडा गावात राहत आहेत. शेवा कोळीवाडा गावातील 17 हेक्टर जमिन साफसफाई करून 08.08.1985 रोजीच्या मंजूर नकाशानुसार भूखंडाची आखणी करणार आहेत.
शेवा कोळीवाडा म्हणजे हनुमान कोळीवाडा गावाचे शासनाच्या नियमानुसार 17 हेक्टर जागेवर पुनर्वसन करणे गरजेचे होते. मात्र मागील 38 वर्षांपासून या गावाला फक्त 2 हेक्टर जागेवरच्या संक्रमण शिबिरात ठेवून फसवणुक केली आहे. जेएनपीटीने फुंडे आणि टाऊनशिप येथील 10 हेक्टर जागा या हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी देण्याचे नोव्हेंबर 2021 मध्ये मान्य केले. मात्र अद्याप याबाबत कार्यवाही केलेली नाही.
व्यवस्थापनाने मासेमारी जमिनीवर भराव करून विविध कंपन्यांना भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्यातून करोडो रुपयांचा नफा कमावत आहे. नोकर भरतीत, बंदर वाढी विस्तारात सप्लाय, गावातील विस्थापितांना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे पुनर्वसन न झाल्याने 15 एप्रिल 2023 पासून मोरा ते घारापुरी हक्काच्या मासेमारी परिसरात कुंटुंबासह मासेमारी बोटी नांगरून एकाचवेळी मासेमारी करून प्रशासनाचा निषेध करणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai