Breaking News
पनवेलमध्ये पाणीकपातीची शक्यता
पनवेल : पनवेल शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणात गाळ साठल्याने धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यात सध्या पाण्याची पातळी खालावल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल, एवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे पनवेल शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अशातच पावसाचे आगमन उशीरा झाले, तर पनवेलकरांनीही तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
सद्यस्थितीत एकट्या पनवेल शहराला 29 एमएलडी पाण्याची गरज आहे. पाताळगंगामधून दर आठवड्याला मिळणारे पाणी कधीतरी दुरुस्तीचे काम असल्याने मिळत नसल्याने आत्तापासूनच शहराला पाणीटंचाईची झळ बसत आहे. त्यात आता धरणात फक्त जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा पाणीसाठा शिल्लक असल्याने लवकरच पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. देहरंग धरणाची कमी क्षमता असल्याने आठवड्यातून फक्त 16 एमएलडी पाणी घेतले जाते. याशिवाय महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 20 एमएलडी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 5 एमएलडी पाणी विकत घ्यावे लागत आहे. अमृत योजनेत पनवेल महापालिकेचा समावेश केल्याने भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. केंद्र शासनपुरस्कृत असलेल्या अमृत योजनेनुसार महापालिका हद्दीतील 29 महसूल गावात एकूण 40 पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यासोबतच गावांमध्ये अंतर्गत एकूण 165 किलोमीटर नवीन जलवाहिनी जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना पाणीप्रश्न मिटण्याची शक्यता आहे.
डोंगरावरून येणाऱ्या पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ साचल्याने धरण गाळाने भरले आहे. हा गाळ काढणे खर्चिक आहे. त्यामुळे देहरंग धरणात पाणी साठवण्याची क्षमता कमी आहे. अशातच आठवड्यातून दोन दिवस प्रत्येकी 8 एमएलडी पाणी घेतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरेल, इतका साठा शिल्लक आहे. - विलास चव्हाण, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पनवेेल महापालिका
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai