Breaking News
पनवेल : वन विभागातर्फे दर वर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राण्यांची गणना केली जाते. यंदा 5 मे रोजी ही गणना सुरु झाली आहे. कर्नाळा अभयारण्यामध्ये वाढलेल्या मानवी हस्तक्षेपाचा प्राण्यांच्या संख्येवर काही परिणाम झाला आहे का, गेल्या वर्षभरात वन्य प्राण्यांची संख्या वाढली की कमी झाली. अभयारण्यात नवीन कोणता प्राणी दाखल झाला आहे का हे या गणनेनंतर कळणार आहे.
वनविभागासोबत वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्था एकत्रितपणे दि. 5 आणि 6 मे रोजी रात्रीच्या वेळेला प्राण्यांच्या हालचाली टिपणार आहेत. याकरिता कर्नाळा अभयारण्यात तीन मचाण आणि ट्रॅक कॅमेरे बसविले आहेत. 20 पेक्षा जास्त जणांचे पथक प्राण्यांची गणना करणार आहे. पनवेलपासून अवघ्या काही कि.मी. अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. लाखो पर्यटक दरवर्षी या अभयारण्याला भेट देत असतात. सुमारे 12.155 चौरस किलोमीटरच्या परिसरात हे अभयारण्य वसले आहे. स्थानिक तसेच स्थलांतरित 147 प्रजातीचे पक्षी या ठिकाणी आहेत. यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित पक्षी आहेत. विविध प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास आहे. बिबटे,डुक्कर,रान मांजर,भेकर,खवल्या मांजर आदी याठिकाणी यापूर्वी पाहिले गेले आहेत. या प्राण्यांच्या सध्याची स्थिती काय आहे? याबाबत माहिती मिळणार आहे. पाणथळ्या शेजारी वनविभागाने निवडलेले कर्मचारी लक्ष ठेवून असणार आहेत. काही ठिकाणी ट्रॅक कॅमेऱ्यांची देखील याकरिता मदत घेतली जाणार आहे. आपटा परिसर,मयूर रेस्ट हाऊस आणि डॉरमेन्ट्री या पाणवठ्याच्या ठिकाणी हि गणना पार पडणार आहे.याकरिता आधुनिक ट्रॅक कॅमेरे याठिकाणी लावले जाणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai