Breaking News
कान्होबा दगडखाण व क्रशर मालक संघटनेचा खुलासा
नवी मुंबई ः स्वराज स्टोन एलएलपीने नवी मुंबईत कोट्यावधींचा खनिकर्म घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केला होता. या उलट कान्होबा दगडखाण व क्रशर मालक संघटनेने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन स्वराज कंपनीला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने प्रशांत पाटील यांच्या आरोपांची धार बोथट झाल्याची चर्चा आहे.
सरकारमधील काही मंत्र्यांना व महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्वराज क्रशर स्टोन एल.एल.पी. कंपनीने पनवेल-उरण परिसरातील दगड-खाणमालकांसोबत करार करून एकाधिकारशाही स्थापन केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यावेळी स्वराज क्रशर स्टोन ही मनमानी दराने खडी व वाळू विकत असून एकाधिकारशाहीच्या माध्यमातून कोट्यावधींचा नफा कमवत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणाची संपुर्ण चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्याची मागणी केली होती.
संबंधितांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शुक्रवारी कान्होबा दगडखाण व क्रशर मालक संघटनेने स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेवून सर्व आरोपांचे खंडन केले आहे. गेली 10 वर्षे दगडखाण व क्रशर मालकांचा धंदा हातावरच्या पोटाप्रमाणे सुरु होता. आता तो संघटितपणे करण्यात येत असून त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ होणार असून क्रशर मालकांनाही त्याचा लाभ होणार आहे. स्वराज्य सोबत केलेल्या करारामुळे प्रत्येक गाडीसोबत रॉयल्टी बंधनकारक केल्याने ज्यांना चोरीच्या माध्यमातून वारेमाप नफा कमवायचा होता त्यांच्या कृत्यांना आळा बसल्याने त्यांची कोल्हेकुई सुरु असल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष सुनील भोईर यांनी केला. या करारनाम्यासाठी कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव व धमकी देण्यात आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. स्वराज स्टोन एलएलपी हा विषय स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणत्याही पक्षाने राजकीय मुद्दा न बनविता प्रकल्पग्रस्तांच्या व्यापक हितासाठी सर्वच दगडखाण व क्रशर मालकांना सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी भोईर यांनी सर्वांनाच केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai