Breaking News
प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आंदोलन
उरण ः प्रदिर्घ काळापासून प्रलंबित विविध मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीच्यावतीने राज्यातील बहूतांश नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात आली. प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास भविष्यात कामगारांमधील असंतोषाचे राज्यव्यापी आंदोलनामध्ये रूपांतर होईल असा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रातील तमाम नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित विविध मागण्या प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करुनही त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 31 जुलै 2023 रोजी मुंबई येथे भव्य राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र विधान सभेचे कामकाज 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2023 पर्यंत बंद आणि पुर परिस्थिती, मदत कार्याकरीता कामगारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने नियोजित मोर्चा तूर्त स्थगित करण्यात आला आहे. मात्र राज्य पातळीवर संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार 31 जुलैला राज्यातील बहूतांश नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात आली आहेत.
उरण नगरपरिषदेसमोरही निर्दशने करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या भावना व प्रलंबित मागण्या शासनाकडे पोहचवाव्यात तसेच या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास भविष्य काळात कामगारांमधील असंतोषाचे राज्यव्यापी आंदोलनामध्ये रूपांतर होणार याची नोंद शासनाने घ्यावी अशा आशयाचे निवेदन नगरपरीषदेमार्फत शासनाला देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी यांना कामगार नेते संतोष पवार, मधूकर भोईर, हरेश जाधव, राजेश सोलंकी, धनंजय आंब्रे, जितेंद्र जाधव व इतर कामगार उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai