Breaking News
विमानतळ नामांतरणाचा प्रस्ताव रखडल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक
उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा केलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारने वर्ष उलटून गेले तरी केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. तो केंद्राकडे पाठवून त्यावर लवकर कार्यवाही करण्यासाठी आगरी व तत्सम समाजातील सर्व आजी माजी आमदारांची बैठक येत्या काही दिवसांत बोलावली जाईल. त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. त्यानंतर सर्व आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे जासई येथे बोलाविण्यात आलेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची सभा शनिवारी (30) जासई ‘दिबां' च्या जन्मगावी समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी अनेक वक्त्यांनी शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे संतोष केणे यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे, परंतु अजूनही काही होत नाही. येथे दुसऱ्या कुणाच्या नावाची चर्चा तर नाही ना? कम्युनिष्ट पक्षाचे कॉ. भूषण पाटील म्हणाले की, लढ्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही. सरकारला जाग आणण्यासाठी आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, कृती समितीशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी, असे पत्र त्यांना दिले आहे. दुसऱ्या कुणाच्या नावाचा विचार झाल्यास तीव्र आंदोलन होईल असेही ते म्हणाले. माजी खासदार संजीव नाईक यांनी आमदार गणेश नाईक यांच्या सुचनेनुसार या प्रश्नी सर्व आगरी आमदारांची लवकरच बैठक बोलावून त्यात विचारविनिमय करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावता येईल, असे सांगितले. या बैठकीस अतुल पाटील, जे.एम.म्हात्रे, विनोद म्हात्रे, विजय गायकर, मनोहर पाटील, सुरेश पाटील, सुनील कटेकर, रूपेश धुमाळ, किशोर घरत, दीपक पाटील, संतोष घरत, रघुनाथ पाटील, अनिल चिकणकर, आदित्य घरत, संजय घरत, पूजा कांबळे, योगिता म्हात्रे, वंदना घरत, शैलेश घाग व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
वातावरण निर्माण करण्याची गरज
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai