Breaking News
उरण ः धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वेस्टेशन येथे व रेल्वेशी संबंधित विकास कामात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दयावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार उपलब्ध व्हावा या प्रमुख मागणीसाठी तसेच रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन व ठेकेदार यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था व ग्रामस्थ मंडळ धुतूमच्या वतीने सोमवारी आमरण उपोषण सुरू केले आहे.
धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्थानकात व रेल्वे संबंधित विविध विकास कामात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जात नसल्याने या संस्थेची धुतुम येथे बैठक संपन्न झाली. प्रकल्पग्रस्तांवर वारंवार अन्याय होत असल्याने शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संख्येच्यावतीने सोमवार, 9 ऑक्टोंबर रोजी रांजणपाडा रेल्वेस्थानकाजवळ आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 9 ऑक्टोबरपासून रांजणपाडा रेल्वे स्टेशन समोर आमरण उपोषण सुरु करण्यात आले. यावेळी उपस्थित शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हणाले की आमच्या जमीनी कवडीमोल भावाने सिडकोने संपादित केल्या. त्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरीता वापरण्यात आल्या. रांजणपाडा हे नविन रेल्वे स्थानक धुतुम महसूल हद्दीत मोडते. त्यामुळे रांजणपाडा रेल्वे स्टेशन व रेल्वेशी संबंधित विविध विकास कामा संदर्भात रोजगार व नोकरीचा पहिला हक्क हा धूतूम प्रकल्पग्रस्तांचा आहे. मात्र रेल्वे व रेल्वे सदर्भात नोकरी तसेच रोजगार भरती मध्ये धुतुम मधील प्रकल्पग्रस्तांना डावलून भरती केली जात आहे. प्रकल्पग्रस्तांना विश्वासात न घेता हि भरती ठेकेदारांमार्फत सुरु आहे. अनेक वेळा ठेकेदार व प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून तसेच प्रत्यक्ष भेटून सदर अन्यायाबाबत जाणीव करून सुद्धा प्रकल्पग्रस्तांना भरती मध्ये डावलले जात असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रांजणपाडा रेल्वे स्टेशन समोर आमरण उपोषण करत असल्याची माहीती त्यांनी दिली.या उपोषणाला सर्व राजकीय पक्षाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपोषणात प्रकल्पग्रस्त व शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था व धुतुम ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी सदस्य ांसह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान या आंदोलन स्थळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, उद्योगपती राजेंद्र खारपाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) तालुकाध्यक्ष परिक्षीत ठाकूर, तालुका सचिव दिनेश पाटील, माजी उपसरपंच शरद ठाकूर,कामगार नेते संतोष घरत,कामगार नेते एन बी कुरणे,जेष्ठ नागरिक दत्तू ठाकूर,राजेश ठाकूर यांनी उपस्थित राहून, प्रत्यक्ष भेट देऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai