Breaking News
बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषद सचिवांचे तहसीलदारांना पत्र
उरण ः बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या मूळ गावठाण व विस्तारीत गावठाण प्रस्तावासाठी तहसीलदारांनी 15 दिवसाच्या आत पंचनामे करावेत अन्यथा उरण तहसिल कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र पांडुरंग चव्हाण यांनी पत्रव्यवहाराद्वारे प्रशासनाला दिला आहे.
गावठाण विस्तारा बाबतीत उच्च न्यायालयाच्या आदेशाने लागलेल्या जनसुनावणीत जिल्हाधिकारी म्हसे यांच्या समोर तहसिलदार पनवेल आणि प्रांताधिकारी पनवेल यांनी मान्य केले की, मागील 70 वर्षात महसूल विभाग उरण-पनवेल (रायगड) यांनी एकाही गावचा गावठाण प्रस्ताव मान्य केलेला नाही. याचा प्रचंड त्रास येथील भुमीपुत्रांना भोगावा लागत आहे. 95 गावांतील शेतकऱ्यांनी नवी मुंबई शहरासाठी आपल्या मालकीच्या 100 टक्के शेतजमिनी सिडको शासनास दिल्या असताना एकही गावाचे नियोजन न करणाऱ्या सिडको शासनाचे प्रचंड अपयश आहे. मूळ 2 एकर गावठाणाबाहेर वाढलेल्या 120 एकर जागेतील घरांवर सिडकोने अतिक्रमीत असा शेरा मारणे हे उरणच्या तहसिलदारांनी येथे वाढलेल्या घरांच्या महसूली नोंदी न घेण्याच्या महसुली चुकांचा दाखला आहे. येत्या पंधरा दिवसात आमच्या घरांचे पंचनामे आपल्या कार्यालयाकडून न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन बालई-काळाधोंडा गावठाण विकास परिषदेमार्फत करण्यात येईल असा इशारा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र पांडुरंग चव्हाण यांनी प्रशासनाच्या सर्व विभागांना दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, महसूलमंत्री, मंत्रालय सचिव,जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी,तहसील कार्यालय उरण, उरण पोलीस ठाणे आदी ठिकाणीही पत्रव्यवहार केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai