Breaking News
अन्यथा उरण रेल्वे उदघाटनाला ग्रामस्थ करणार विरोध
उरण ः येत्या दोन-तीन महिन्यात उरण रेल्वे सेवा सुरु होणार आहे. मात्र त्यापुर्वी या मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या नामकरणचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभुमीवर सिडकोने सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि स्थानिक पोलीसांची बैठक बोलावली होती. यामध्ये जोपर्यंत रेल्वे स्टेशनला स्थानिक महसूली गावांची नावे देण्यात येणार नाही तोपर्यंत उरण मधील कोणत्याही रेल्वे स्टेशनचे उदघाटन होऊ देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
नेरुळ/बेलापुर ते उरण या या मार्गातील खारखोपर ते उरण हा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांची कामे पुर्ण झाली आहेत. केवळ उद्घाटनाची प्रतिक्षा आहे. मात्र त्यापुर्वी स्थानकांना दिलेल्या नावांवरुन स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येथील स्थानकांना महसुली गावांची नावे देण्याची मागणी अनेक महिन्यांपासून सुरु आहे. यासाठी आंदोलनाचे हत्यारही उपसम्यात आले होते. आता हा मार्ग सेवेत येण्याआधी तेथील स्थानकांचे नामांतरण स्थानिक महसूली गावांची नावे देवून न केल्यास उरण मधील कोणत्याही रेल्वे स्टेशनचे उदघाटन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सिडको प्रशासनाने सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांना तसेच उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम यांना 29 नोव्हेंबर रोजी सिडको भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी 57 जणांची उपस्थिती होती. नवघर,बोकडविरा,कोटगाव, धुतूम,जासई या गावांची नावे त्या त्या रेल्वे स्टेशनला सिडको किंवा शासनाकडून न दिली गेल्यास वरील गावच्या ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. गावांची नावे द्या,नंतरच उदघाटन असे मिटिंगमध्ये स्पष्ट ठणकावून सांगण्यात झाले. दरम्यान, गावांना नावांचा अधिकार मिळेल आणि नावे दिल्याशिवाय उरण रेल्वेचे उदघाटन रेंगाळणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे सिडको व रेल्वे प्रशासनाने उरण तालुक्यातील विविध रेल्वे स्टेशनच्या नामांतरच्या बाबतीत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय अधिकारी शांतनू गोयल यांनी समस्या ऐकून गावांच्या नावांसंबंधी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. तसेच पुढची बैठक सिडको आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत घेऊ असे सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai