Breaking News
नवी मुंबई : गोव्याच्या पोर्व्हरीम पोलिसठाणे हद्दीत घडलेला हत्या व दरोड्याचा गुन्हा नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला आहे. संशयित कार ताब्यात घेऊन कारमधील दोघांची चौकशी केली असता त्यांनी गोव्यात हत्या करून पळ काढत असल्याची कबुली दिली. याबाबत नवी मुंबई पोलिसांनी गोवा पोलिसांना कळवले असता एका व्हिलामध्ये वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.
रविवारी दुपारी गोवा मार्गावरून एक संशयित कार नवी मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी उपनिरीक्षक सचिन बाराते, बालाजी चव्हाण, विश्वास भोईर, सुमंत बांगर, अजय वाघ व पेण पोलिस यांच्या मदतीने सापळा रचला होता. त्यामध्ये एक बगैर नंबरप्लेटची कार अडवून त्यामधील तरुण व तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांनी सदरची कार चोरीची असून त्यांनी एकाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी याबाबत गोवा पोलिसांना कळवले असता पोर्व्हरीम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका व्हिलामध्ये निम्स बादल (77) यांचा मृतदेह आढळून आला. नवी मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे हत्येचा गुन्हा उघड झाला असून दोघांनाही गोवा पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
जितेंद्र साहू (32) व राहूजा (22) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा साथीदार पळून गेलेला आहे. या तिघांची मृत निम्स यांच्यासोबत कोरोना काळात सोशल मीडियाद्वारे ओळख झाली होती. निम्स यांच्या मालकीचा व्हीला असून त्याठिकाणी ते एकटेच राहत असल्याने त्यांनी या तिघांना गोवा फिरण्यासाठी बोलवले होते. त्यानुसार शनिवारी ते त्याठिकाणी आले होते. मात्र रात्रीच्या सुमारास निम्स यांची हत्या करून त्यांच्या अंगावरील दागिने व त्यांची कार घेऊन त्यांनी तिथून पळ काढला. यावेळी त्यांनी गाडीची नंबरप्लेट काढली असल्याने, या बगैर नंबरप्लेटच्या गाडीची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. परंतु निम्स यांनी राहूजा सोबत गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केल्याने तिघांनी मिळून उशीने त्यांचे तोंड दाबून हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai