Breaking News
सिडकोच्या घरांच्या किमंती 38 लाखांच्यावर
नवी मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर या गृहनिर्माण योजनेत 26000 घरांची सोडत जाहीर केली. मात्र प्रकल्प, लोकेशन, घरांचे क्षेत्राविषयी माहिती देऊन किमंती गुलदस्त्यात ठेवल्या होत्या. अखेर मंगळवारी सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र या घरांच्या किंमती 38 लाखांच्या वर असल्याने सर्वसामान्यांना चांगलाच घाम फुटला असून सिडको परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली सर्वसामान्यांची परवड करत असल्याची टिका नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत.
नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदीचं स्वप्न उराशी बाळगून लाखो जणांनी सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरले आहेत. सिडकोच्या एकूण 26 हजार घरांच्या सोडत प्रक्रियेसाठी आत्तापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक अर्ज सादर झाले आहेत. मात्र किमंती जाहीर न केल्याने अर्ज नोंदणीसाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सिडकोची ही 26 हजार घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत) व अल्प उत्पन्न गटाकरता (वर्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त) नवी मुंबईच्या वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोड परिसरात उपलब्ध आहेत. मात्र किमंती कधी जाहीर होतील याची उत्सुकता सर्वांना होती. आता त्या घरांच्या किमती जाहीर झाल्यामुळे अर्जदारांची प्रतीक्षा संपली असली तरी मात्र धडकी भरवणाऱ्या किमंती पाहून सिडकोविषयी नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे. या योजनेत अर्ज नोंदणीसाठी 10 जानेवारी 2025 ही अंतिम मुदत दिली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या घरांच्या किमती 38 ते 48 लाखांपर्यंत असतील. तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या घरांच्या किमती 34 लाख ते 97 लाखांच्या दरम्यान असतील. यामध्ये तळोजातील दोन गृहप्रकल्पांच्या किमंती 25-26 लाख आहेत. उर्वरित सर्व ठिकाणाचे प्रकल्प हे 38 लाखांच्यावर असल्याने ही घरे महाग असल्याची चर्चा आहे. सर्वात महागडी घरे खारघर सेक्टर 2 ए येथील प्रकल्पातील असून त्याची किंमत 97 लाख आहे. त्याखाली वाशी ट्रक टर्मिनल येथील घराची किमंत 74 लाख एवढी आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी उत्पन्नाची आर्थिक मर्यादा वर्षाला 6 लाखांच्या आत असायला हवी. परंतु, 6 लाखांखालील उत्पन्न असणाऱ्या घटकांना 40 ते 48 लाखांचे घर कसेकाय परवडणार असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. सिडकोनेजाहिर केलेल्या किमंती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने नवी मुंबईत सिडकोचे हक्काचे परवडणारे घर मिळेल असे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक सर्वसामान्यांची निराशा झाली असून परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली सिडको सामान्यांची चेष्ठा करत असल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गट
अल्प उत्पन्न घटक गट
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai