किंमत निश्‍चित होऊनही मास्कचे दर चढेच

नवी मुंबई : मास्कच्या विक्रित होणारा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने गेल्या आठवड्यात मास्कच्या किंमती निश्‍चित केल्या. मात्र तरीही चार रुपयांचा तीन पदरी मास्क दहा रुपयांना विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सुधारित दरानुसार एन 95 मास्कचा अद्याप पुरवठा झालेला नसल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. दरम्यान, नागरिकांच्या पसंतीचे फॅन्सी मास्क मात्र 40 ते 60 रुपयांना विकले जात आहेत.

शासनाकडून मास्कची सक्ती होताच एप्रिल महिन्यापासून शहरात सर्वत्र एन 95 मास्क हे दोनशे ते तीनशे रुपयांना विकले जात होते. दोन व तीन पदरी मास्क तीस ते साठ रुपयांना, तर नागरिकांच्या आवडीनुसार फॅन्सी मास्क 50 ते 80 रुपयांना मिळत होते. मात्र, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वमान्यांना मास्क विकत घेता यावेत, याकरिता फॅन्सी मास्क व्यतिरिक्त एन 95, तीन पदरी व दोन पदरी मास्कच्या किमती शासनाने निश्‍चित केल्या आहेत. यानंतरही अनेक ठिकाणी चार रुपयांचा मास्क दहा रुपयांना विकला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता पुरवठा कमी असल्याची कारणे पुढे केली जात आहेत, तर एन 95 प्रकारातले मास्क शहरात बहुतांश ठिकाणी उपलब्धच नसल्याचे पाहणीत समोर आले. सुरुवातीच्या काही दिवसांत दोनशे ते तीनशे रुपयांना विकले जाणारे हे मास्क मागील तीन महिन्यांत शंभर ते दोनशे रुपयांना विकले जात होते. त्याला मागणीही असल्याने व्यावसायिकांनी त्याचा साठा करून ठेवला होता, परंतु एन 95 मास्कसाठी 19 ते 49 रुपये दर निश्‍चित केल्याने ज्यादा किमतीच्या मास्कची विक्री अनेकांनी थांबवली आहे. काहींनी हा साठा संबंधित पुरवठादाराला परतही पाठवला आहे.