Breaking News
भूधारकांना संपर्क साधण्याचे सिडकोचे आवाहन
नवी मुंबई ः आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) अंतर्गत नियोजित आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देण्यासाठी नगररचना परियोजना हा प्रमुख विकास प्रारुप म्हणून स्वीकारण्यात आला आहे. सध्या नैना क्षेत्रात एकूण 12 नगररचना परियोजना प्रस्तावित असून, त्यापैकी परियोजना 1 आणि 2 या अंतिम मंजुरी प्राप्त झालेल्या आहेत, तर परियोजना 3 ते 7 यांना प्राथमिक मान्यता मिळाली आहे. नगररचना परियोजना 8, 9, 10, 11 आणि 12 यांसाठी लवाद सुनावणीस प्रारंभ झाला असून, संबंधित भूधारकांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सिडकोने केले आहे.
नैना क्षेत्रातील कामांना गती देण्यासाठी नगररचना परियोजना 8, 9, 10, 11 आणि 12 अंतर्गत भूखंड अंतिमिकरण व लवाद सुनावणी कार्यवाही सुरू झाली आहे. या सुनावणी प्रक्रियेमध्ये भूधारकांचे म्हणणे विचारात घेऊन त्यांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. या संदर्भात, लवाद सुनावणीमध्ये भूधारकांनी त्यांचे म्हणणे सादर करावे, जेणेकरून विकास प्रक्रियेत पारदर्शकता आणि समावेशकता सुनिश्चित करता येईल. नगररचना परियोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि भूधारकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सिडकोकडून व्यापक जनजागृती मोहीम देखील राबवली जात आहे. नैनाक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सुधारणा शुल्क / बेटेरमेन्ट चार्जेस संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक पुढील प्रक्रिया सुरू आहे.
नगररचना परियोजना 8, 9, 10, 11 आणि 12 अंतर्गत भूधारकांसाठी नैना लवाद कार्यालय, बेलापूर रेल्वे स्थानक संकुल, 7 वा मजला, टावर नं 10, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे कार्यरत असून, संबंधित भूधारकांनी या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे सिडकोतर्फे सूचित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ज्या भूधारकांना त्यांच्या वाटप झालेल्या भूखंडांबाबत आक्षेप आहेत त्यांनी लवाद सुनावणी दरम्यान आपली भूमिका मांडावी. भूधारकांच्या आक्षेपांचे निराकरण योग्य रीतीने केले जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai