14 गावांवरुन गणेश नाईकांचा लेटरबॉम्ब
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 12, 2025
- 749
नवी मुंबई पालिका हद्दीतून गावे वगळण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती
नवी मुंबई ः राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाणे तालुक्यातील 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली होती. सदरची 14 गावे भौगोलिकदृष्ट्या नवी मुंबई महापालिकेला संलग्न नसल्याने ती वगळण्याची विनंती वनमंत्री गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. नाईकांच्या या लेटरबॉम्बने पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडाला असून अनेकजण त्याला शिंदे विरुद्नाईक असा रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांना कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन 1991 मध्ये नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाली त्यावेळी ठाणे तालुक्यातील दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बाम्मली, नारीवली, बाळे, नागांव, भंडाल, उत्तर शीव, गोठेघर ही 14 गावे गावांचा समावेश नवी मुंबई पालिका क्षेत्रात करण्यात आला होता. महापालिकेने 1992 ते 1995 या काळात अनेक विकासाची कामे केली होती. त्यामध्ये रस्ते बांधणे, दहिसर येथे रुग्णालय बांधणे तसेच अनेक गावांमधील तलावांचे गाळ काढण्याची करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांनी नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होण्यास विरोध केल्याने 2007 साली ही गावे नवी मुंबई महापालिका हद्दीतून वगळण्यात आली होती. दरम्यानच्या काळात या 14 गावांचा विकास आराखडा न बनल्याने तेथे प्रचंड अनधिकृत बांधकामे उभी राहीली आहेत. तसेच या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शासनाची गुरचरण जमीन असून तेथेही अतिक्रमणे झाली आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही 14 गावे नवी मुंबई महापालिकेला जोडली होती. परंतु तेथील अतिक्रमणे, अनधिकृत गोदामे, गॅरेज उभी असून त्यांचेवर कारवाई केल्यास मोठा रोष उत्पन्न होऊ शकतो आणि तेथील पायाभुत सेवासुविधांचा भार नवी मुंबई महापालिकेवर येणार असल्याची जाणिव मंत्री गणेश नाईक यांना असून त्यांनी सुरुवातीपासूनच शासनाच्या या निर्णयाचा ठाम विरोध केला आहे.
नाईक यांनी 7 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन खरी परिस्थिती विशद केली आहे. त्यामध्ये 14 गावांमधील 4 गावांच्या एका बाजुस पनवेल महापालिका, दुसऱ्या बाजुस कल्याण-डोंबिवली महापालिका तिसऱ्या बाजुस ठाणे महापालिका तर चौथ्या बाजुस पारसिक डोंगर असल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रात जाण्यासाठी ठाणे किंवा पनवेल महापालिका हदद्दीतून जावे लागत असल्याने ही 14 गावे भौगोलिकदृष्ट्या नवी मुंबई महापालिकेशी संलग्न नसल्याचे नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्याचबरोबर 14 गावांच्या 20.89 चौ.कि.मी. क्षेत्रात पायाभुत सेवासुविधा देण्यासाठी 6100 कोटी रुपये खर्च येणार असून तो नवी मुंबईकरांच्या माथी मारण्यास नाईकांनी विरोध दर्शवला आहे. शासनाने किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला पायाभुत सेवासुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती परंतु अद्यापपर्यंत अनुदान प्राप्त झाले नसल्याचे पत्रात नमुद केले आहे. त्यामुळे ही 14 गावे नवी मुंबई महापालिकेच्या हदद्दीतून वगळण्याची विनंती नाईकांनी केली आहे.
नाईकांच्या या लेटरबॉम्बनंतर अनेक प्रतिक्रिया राजकीय स्तरातून उमटल्या असून विरोधकांनी नाईकांच्या या भुमिकेचा विरोध केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये शिंदे विरुद्ध नाईक असा कलगीतुरा उभा केला आहे. परंतु नाईकांनी घेतलेली भुमिका ही नवी मुंबईच्या हिताची असल्याचे नाईक समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस कसे हाताळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- नजर पालिकेवर
आगामी महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून 14 गावे समाविष्ट करण्यात आल्याची चर्चा आहे. 14 गावातून सूमारे 10 ते 15 नगरसेवक निवडून आल्यास नाईकांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा हेतु असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी विरोध करुन शिंदेंना पुन्हा एकदा धक्का दिल्याचे बोलले जाते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai