Breaking News
200 झाडांची कत्तल केल्याने गुन्हे दाखल करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाच्या समोरील आणि एनआरआय पोलीस ठाण्याच्या शेजारील परिसरात जवळजवळ 200 पेक्षा अधिक झाडे तोडली आहेत. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पालिकेने झाडे तोडण्यासासाठी व तेथील जागेचे सपाटीकरण करण्यासाठी वापरण्यात आलेले 3 जेसीबी जप्त केले असून त्यावर प्रत्येकी 30 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. परंतु अद्यापही झाडे तोडली कोणी याचा उलगडा झालेला नाही.
नवी मुंबई शहरात होऊ घातलेल्या विमानतळामुळे जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच पामबीच मार्गालगत जागांचे भाव कोटींची उड्डाणे घेत असल्याने या ठिकाणी सिडकोच्या मदतीने भूखंड मिळवण्यासाठीची मोठी स्पर्धा पाहायला मिळते. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी झाडे तोडण्याचा प्रकार झाला आहे, तो कांदळवनाचा बफर झोन असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. पालिका व पोलीस यांच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात असताना सरकारी सरकारी आस्थापना काय करत होत्या असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी विचारला आहे. मुळातच हा परिसर हा पक्षी व कोल्हा प्राण्यांसाठीचा रहिवास असलेला परिसर असून येथे वृक्षतोड करण्यात आली आहे. याबाबत वनसंरक्षक अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
बेलापूर सेक्टर 52 अ परिसरातील भूखंड क्रमांक 3,6,7 परिसरातील झाडे जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने पालिकेने तात्काळ जागेवरील 2 जेसीबी सील केले आणि प्रत्येकी 30 हजार रुपयांचा दंड लावला. सिडकोकडून कोणाला हा भूंखंड देण्यात आला याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाणार आहे.
नेरुळ सेक्टर 52 अे हा परिसर सीआरझेड अंतर्गत येत असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खारफुटी आणि दाट जंगल आहे. याच परिसरात डीपीएस तलाव असून या ठिकाणी फ्लेमिंगोंचा मोठ्या प्रमाणात रहिवास असतो. फ्लेमिंगोंसह दुमळ सोनेरी कोल्हा तसेच मुंगूस आदी प्राण्यांचे येथे वास्तव्य आहे. तसेच हा परिसर बफर जोनमध्ये येत असताना येथे वृक्षतोड झाल्याने पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भुमिक घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी नेत्रा शिर्के यांच्या पुढाकाराने पर्यावरणप्रेमींनी गणेश नाईक यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पर्यावरणप्रेमी सुनील, श्रुती अग्रवाल, वन विभाग, कांदळवन विभागाचे दीपक खाडे यावेळी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai