Breaking News
8 जानेवारीपर्यंत रंगणार 240 खेळाडुंचा चुरशीचा खेळ
नवी मुंबई ः नवी मुंबई प्रीमियर क्रिकेट लीग म्हणजेच एनएमपीएल स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ 4 जानेवारी रोजी कोपरखैरणे येथील भूमीपुत्र मैदानावर झाला. माजी खासदार संजीव नाईक आणि या उपक्रमाचे पुरस्कर्ते माजी आमदार संदीप नाईक यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेचे उद्घाटन झाले. यात सोळा संघ सहभागी झाले असून अंतिम सामना 8 जानेवारी रोजी होणार आहे.
नवी मुंबईतील क्रिकेटपटुंना एका भव्य प्लॅटफॉर्मवर व्यावसायिक स्पर्धा खेळण्याचा अनुभव मिळावा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईचा एकोपा वाढवा असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सदर स्पर्धा संदीप नाईक यांनी सुरू केली. या स्पर्धेचे तीन हंगाम यशस्वीरिता पूर्ण झाले आहेत. कोरोना काळातही खबरदारीचे उपाय पाळून स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाच्या निराशमय वातावरणात या स्पर्धेमुळे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण केली होती. सदर स्पर्धेने स्वतःच वेगळेपण जपले असून तिला मोठी उंची प्राप्त करुन देण्यासाठी यावर्षी खेळाडुंचा लिलाव मुंबईतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये पार पडला. यावर्षीची अजिंक्यपदाची ट्रॉफी विशेषकरुन ग्रॅफाईट धातूपासून आकर्षक आणि कलात्मक पध्दतीने तयार करण्यात आली आहे. नवी मुंबई प्रीमियर लीग हि दरवर्षी सामाजिक संदेश देऊन आयोजित केली जाते. यावर्षी ‘डअध छज ढज ऊठणॠड' हा संदेश देण्यात आला आहे.
स्पर्धेचा वाढता लौकिक पाहता सदर स्पर्धेत विकी भोईर आणि अन्य आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळणारे खेळाडू आवर्जून सहभागी होतात. त्यांचा खेळ पाहण्याची संधी येथील खेळाडुंना मिळते. यावर्षी सोळा संघ मालकांचे सोळा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. 240 खेळाडुंचा चुरशीचा खेळ पहावयास मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा नियमानुसार एनएमपीएल स्पर्धा होत असून 8 जानेवारी रोजी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी माजी नगरसेवक केशव म्हात्रे, लिलाधर नाईक, माजी नगरसेविका उषा भोईर, एनएमपीएल आयोजन समितीचे स्वप्निल नाईक, दीपक पाटील, कुणाल दाते, ओंकार नाईक, प्रतिक पाटील, निलेश पाटील, तुषार पाटील, क्रिकेटप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढच्या वर्षी एनएमपीएल भारताबाहेर खेळवण्याचा मानस असल्याची माहिती संदीप नाईक यांनी यावेळी दिली. टेनिस क्रिकेटला प्रोत्साहन, मान्यता, आंतरराष्ट्रीय स्तर मिळवून देण्याचा एनएमपीएल एक प्रयत्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संजीव नाईक यांनी एनएमपीएलमुळे होतकरु खेळाडुंना व्यावसायिक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत असल्याचे नमूद केले. टेनिस क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेण्याचा संदीप नाईक यांचा प्रयत्न असल्याचे नाईक म्हणाले. तरुण पिढीने व्यसनाला नाही म्हणत खेळाच्या माध्यमातून आपले आयुष्य सकारात्मकरित्या जगावे, असा संदेश एनएमपीएलच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai