Breaking News
भाड्याच्या घरांना मागणी वाढली : घरभाडे वाढले
नवी मुंबई : शहरात सध्या पुनर्विकासाचे वारे सुसाट वाहू लागले आहेत. जुन्या जीर्ण झालेल्या इमारतींच्या जागी नवे उंचच उंच टॉवर उभे राहू लागले आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांवरील असलेला ताण संपुष्टात येणार आहे. त्यामाध्यमातून नव्या अत्याधुनिक सुविधा येऊ घातल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणार असून त्याला एक विशिष्ट आयाम प्राप्त होईल. एकट्या वाशी शहरात 6 ते 7 ठिकाणी इमारतींचे पुनर्वसन सुरू आहे. तर सुमारे 4 ते 5 सोसायटी प्रतीक्षेत आहेत. त्यांची विकासकांबरोबर बोलनी सुरू असून अपार्टमेंट असोसिएशनचे रूपांतर गृहनिर्माण संस्थांमध्ये झाले आहे. वाशी हा शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने या ठिकाणी शाळा, हॉस्पिटल, कार्यालये तसेच बाजारपेठ या गरजेच्या सुविधा व्यापक प्रमाणात आहेत. सेक्टर 9, 9 व 10 मधील परिसरामध्ये पुनर्विकासची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या ठिकाणी मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. शाळा, हॉस्पिटल, बाजार जवळ असल्याकारणाने पुनर्विकासासाठी गेलेल्या इमारतींमधील रहिवाशी आजूबाजूच्या सेक्टर 14, 15, 16 तसेच 16 मध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या परिसरात भाडेतत्त्वावर असणाऱ्या घरांची मागणी वाढली आहे. घर शोधण्यासाठी रहिवाशांची पायपीट होत आहे. रिकाम्या झालेल्या सदनिका पुन्हा दोन दिवसातच भाड्याने दिल्या जात आहेत. त्यामुळे इस्टेट एजंटला (मालमत्ता दलाल) जरी सुगीचे दिवस आले असले तरी त्यांची घर शोधताना दमछाक होत आहे. वनआरके, 1बीएचके, टू बीएचके घरांच्या भाड्यांमध्ये सुमारे 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. 8 ते 10 हजार भाडे असणारे वनआरके घराचे भाडे 12 हजारांपर्यंत, 1 बीएचके घरांचे भाडे 12-13 हजारावरून 16 ते 18 हजारापर्यंत तर टू बीएचके घरांचे भाडे 18 ते 20 हजाराहून 25 ते 30 हजारापर्यंत वाढले आहे. त्यामुळे घर भाड्याने घेऊन राहणाऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. असे असले तरी रिडेव्हलपमेंटच्या या झंझावातात भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या घरमालकांची मात्र ‘डेव्हलपमेंट' झाली आहे.
भाडेतत्त्वावरील घरांचे प्रमाण कमी असून ते लवकर मिळणे दुरापास्त झाले आहे. भाडे रक्कम ही खूप वाढली आहे. - अमोल शेरेकर, रहिवाशी, वाशी
मी भाडेतत्वावर माझे घर देतो. अलीकडच्या काळात म्हणजे या वर्षभरात मागणी वाढली असून एक भाडोत्री घर खाली करायच्या आधीच दुसरा घर घेण्यास तयार असतो. - संजय चव्हाण, घरमालक, सेक्टर 15, वाशी
गेल्या वर्षभरापासून भाडेतत्त्वावरील घराची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून ग्राहकांची वन बीएचकेला जास्त पसंती दिसून येत आहे. भाडे तत्वावरील घरांची संख्या कमी असल्यामुळे घर शोधण्यासाठी आमची दमछाक होत आहे. - तुषार जगताप, इस्टेट कन्सल्टंट, वाशी
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
विजय आहिरे