Breaking News
युक्रेनी नागरिकांना आधारकार्ड, पॅनकार्ड ; पोलीस व आयकर विभागाचे दुर्लक्ष
मुंबई ः सध्या राज्यात गाजत असलेल्या टोरेस घोटाळ्यातील चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या घोटाळ्यातील संशयित आरोपी ओलेना स्टोईयन व तझागुल खासाटोवा या युक्रेनी नागरिकांकडे आधारकार्ड व पॅनकार्ड असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर आयकर विभागाने 14 नोव्हेंबर रोजी पाठवलेली नोटीस तसेच 29 जुन रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाणे व 24 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई पोलीसांनी पाठवलेल्या नोटीसीवर वेळीच दखल घेतली असती तर टोरेस घोटाळ्याचा पर्दाफाश वेळेवर झाला असता त्यामुळे या घोटाळ्यास शासकीय यंत्रणांची दिरंगाई जबाबदार असल्याची भावना गुंतवणुकदारांनी व्यक्त केली.
मुंबई, ठाणे व उपनगरात गुंतवणुकदारांना हजारो कोटींचा गंडा घालणाऱ्या टोरेस या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश त्यांचेच लेखापरिक्षक अभिषेक गुप्ता यांनी त्यांच्या लेखापरिक्षणात उघड केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी याबाबत अनेक शासकीय यंत्रणांना सूचित केले. अभिषेक गुप्ता यांनी त्यांच्या लेखापरिक्षण अहवालात 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम नियमबाह्यपणे स्विकारणे, 84.41 कॅशबॅक वॉवचर हिशोबात न घेणे, युक्रेनी नागरिकांचा कंपनीच्या व्यवहारात समावेश असणे तसेच रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय 4-10 टक्के परतावाआठवड्यात देणाऱ्या योजना राबविणे आणि मल्टिलेवल मार्केटिंग सदर कंपनी करत असल्याचे गंभीर ताशेरे ओढले होते. या अहवालाची दखल घेऊन आयकर विभागाने प्लॅटिनियम हर्न प्रा.लि. यांना 14 नोव्हेंबर रोजी कंपनीचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश आयकर उपनिर्देशक निरज कुमार यांनी दिले होते. यावर काय कारवाई झाली ते तपासात पुढे येईल. त्याचबरोबर टोरेस ब्रँण्ड राबवत असलेल्या अधिक परताव्याच्या स्किमबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांनी 29 जुन 2024 व नवी मुंबई आर्थिक गुप्त वार्ता पथक गुन्हे शाखा यांनी 24 ऑक्टोबर रोजी नोटीस देऊन सर्व शासकीय परवानग्या व नोंदणी कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश केले होते. या दोन्ही नोटीसींवर संबंधित यंत्रणांनी काय कारवाई केली याबाबतचा तपशील तपासात उघड होईल अशी प्रतिक्रिया तक्रारदार यांचे वकील विवेक त्रिवेदी यांनी आजची नवी मुंबईशी बोलताना दिली.
धक्कादायक बाब म्हणजे टर्की व युक्रेनचे नागरिक असणाऱ्या ओलेना स्टोईयन व तझागुल खासाटोवा यांच्याकडे भारतीयत्वाची ओळख असणारे आधारकार्ड असल्याचे आढळून आलेआहे. एवढेच नव्हे तर या दोघांकडे पॅनकार्डही सापडले आहे. ही दोन्ही महत्वाची ओळखपत्रे देताना भारतातील शासकीय यंत्रणांनी त्यांची खातरजमा केली की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. टोरेस ब्रँड नवीन ग्राहकांना सोन्यावर 2 टक्के, चांदीवर 4 टक्के तर अमेरिकन डायमंडवर 5 टक्के दर आठवड्याला परतावा देत असे. नवीन ग्राहकांना 10 टक्के कमिशन तर 10 ग्राहक मिळवून देणाऱ्या ग्राहकाला 20 टक्के कमिशन टोरेसमार्फत देण्यात येत होते. कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे यांनी आपल्या तक्रारीत प्लॅटिनियम हर्न प्रा.लि. ही कंपनी 300 रुपयांचा अमेरिकन डायमंड 30 हजार रुपयांना विकून ग्राहकांची फसवणुक करत असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी 75 किलो चांदी व 25 किलो सोन्याची गैरमार्गाने आयात करुन ते दुकानात पाठवल्याचे पोलीसांना कळवले होते. शासन या घोटाळ्याची चौकशी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागामार्फत करत असून यातून हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. अद्यापपर्यंत पोलीसांनी अटक केलेले आरोपी हे भारतीय नागरिक असून त्यांनीच या घोटाळ्याबाबत पोलीसांना अवगत केले होते. परंतु, खरे परदेशी गुन्हेगार या अगोदरच पसार झाल्याचे बोलले जात आहे.
आरोपींनी भारतातील पैसा परदेशात पाठवला आहे. सदर आरोपी हे कोणता पासपोर्ट वापरत होते याचा तपशील पोलीसांना तक्रारदार यांनी दिला आहे. अजुनही सदर पासपोर्टवरुन आरोपी कोणत्या देशात गेले याचा छडा पोलीसांनी लावला नाही. तसेच टोरेस ब्रँडचे इन्स्टाग्रॅम सुरु असून ते कोणामार्फत व कुठुन चालवले जात आहे याचाही छडा लागणे गरजेचे आहे. या घोटाळ्यातील मास्टरमाईंड यांना अटक होणे महत्वाचे आहे. -विवेक त्रिवेदी, ॲड. उच्च न्यायालय
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai