Breaking News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप पदाधिकाऱ्यांना ग्वाही
नवी मुंबई : ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेच्या नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होताच नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरुन राजीनामा नाट्य रंगले. म्हस्केंचा प्रचार करणार नाही अशी भुमिका त्यांनी घेतली होती. मात्र सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून यापुढे नवी मुंबईतील सामाजिक आणि विकासकामांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यांच्या आश्वासनानंतर नाईक समर्थक भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाल्याने त्यांनी म्हस्केंचा प्रचार करण्यास संमती दर्शवली.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक यांना डावलल्याने नाराज झालेल्या नवी मुंबईसह, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील नाईक समर्थक भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. चार दिवसांपासून कार्यकर्ते आपल्या मतावर ठाम राहिल्याने अखेर फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. सोमवारी खारघर येथील जाहीरसभा आटोपून त्यांनी संध्याकाळी नाईक यांच्या महापे येथील क्रिस्टल हाउस या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. तेथे गणेश नाईक यांच्यासह डॉ.संजीव नाईक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्याबरोबर जवळपास पाऊण तास चर्चा केली. चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली, याचा तपशील समजू शकला नाही. त्यानंतर फडणवीस यांनी नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून यापुढे नवी मुंबईतील सामाजिक आणि विकासकामांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. असे असले, तरी त्यांच्या आश्वासनानंतर नाईक समर्थक भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली. त्यानंतर उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराला लागण्याचे आवाहन केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai