Breaking News
वैदभय स्नेहसंमेलनात डॉ. सुरेश हावरे यांचे आवाहन
मुंबई : मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या वैदर्भियांनी कोकणी माणसाचा आदर्श ठेवत आपली मायभूमी विदर्भाच्या संपर्कात राहून विदर्भाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ बांधकाम व्यावयासिक व माजी अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे यांनी केले. आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या तिसऱ्या वैदभय स्नेहसंमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.
नवी मुंबई व मुंबई परिसरातील वैदर्भियांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने रविवारी वैदर्भियांचे तिसरे स्नेहसंमेलन खारघर येथील एमटीडीसी रेसिडेन्सीत आयोजित केले होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश हावरे, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत डांगे उपस्थित होते. यावेळी महिलांचा हळदी-कुंकू आणि बाळगोपाळांची लूट पार पडली.
चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपराः माय धुरपता हा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहून विदर्भ-मराठवाड्यातील शेकडो वर्षांच्या संबंधांमागील लोकपरंपरा उलगडणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव भागवत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भागवत यांनी गोंड राजांनी मराठी भाषेच्या प्रचारात आणि लोककल्याण क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती दिली. कोकणातील प्रत्येक गावाची एक संघटना वा मंडळे असून मुंबईत राहूनही ते गावच्या विकासात योगदान देतात. या गावाच्या मंडळांनी चाळीत वा सोसायट्यांमध्ये गावाच्या मालकीची एक खोली घेतलेली असते. या खोलीत गावाकडून नोकरीसाठी येणाऱ्या तरूणाची काही महिने राहण्याची सोय होते. कोकणी माणूस आधी मनिऑर्डरने आणि आता ‘जी-पे’ने पैसे पाठवतो. मात्र या उलट विदर्भाचा माणूस मुंबईत आला की विदर्भाशी कनेक्ट राहत नाही. तो आधीही मनिऑर्डरने पैसे पाठवत नव्हता आणि आताही जी-पे ने पैसे पाठवत नाही. हे चित्र बदलायला हवे. आपण विदर्भाच्या विकासासाठी मुंबईत राहून योगदान द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपला विदर्भ संस्थेने एखादा एप विकसित करून सदस्य नोंदणी, नोकरी शोधणे, विवाहासाठी स्थळ शोधणे या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचे हस्ते एलअँड टी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदी पदोन्नती प्राप्त केलेले रमेश हडपे, सिडकोत कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती झालेले प्रकाश रोडे, सहा.कार्यकारी अभियंता पदी पदोन्नती झालेले अनुज हिवरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच 10 वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या गुंजन चुंचूवार व अनिका कठाणे या विद्यार्थिनींचा व वृंदा ढेंगळे यांचा इंग्रजी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी शांभवी गतफाणे या बालगायिकेने गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai