Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिकेचा कारभार लोकाभिमुख व गतीमान होण्यासोबतच कार्यालयीन शिस्तीवरही नमुंमपा आयुकत् डॉ. कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता मुख्यालयातील सर्व विभागांना अचानक भेट देत पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रशासन विभागाचे उप आयुक्त शरद पवार उपस्थि होते.
आयुक्तांनी अधिकारी, कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती वेळेवर असणे अनिवार्य असल्याचे नमूद करीत प्रत्येक विभागप्रमुखाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी वेळेवर येत असल्याची खात्री करून घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिले. कार्यालयातील नस्ती व कागदपत्रे शासकीय नियमावलीनुसार कपाटांमध्ये ठेवलेले असावेत याची विशेष दक्षता घेण्यात यावी व विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात त्या पध्दतीने अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा करुन घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. मुख्यालयातील प्रत्येक विभागात नागरिक मोठया संख्येने भेटी देत असल्याने सौंदर्याला बाधा पोहचणार नाही अशा प्रकारे स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानाचे संदेश प्रसिध्दी करण्यात यावेत असेही आयुक्तांनी सूचित केले. यावेळी स्वच्छतागृहांचीही तपासणी करुन आणखी सुधारणा करण्याच्या सूचना करतानाच वॉटर कुलरची अंतर्गत स्वच्छता तसेच त्याच्या आजुबाजूच्या परिसराची स्वच्छता नियमीतपणे होत राहील याकडे काटेकोर लक्ष देण्याचे नेिर्देश देण्यात आले. सीसीटिव्ही कंट्रोल रुममधील अंतर्गत व्यवस्थापनामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचे निर्देशित करीत त्या ठिकाणची माहिती त्वरीत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कार्यप्रणाली सक्षम करावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष कायम सतर्क असायला हवा. तसेच त्या ठिकाणी नागरिकांमार्फत येणारे संदेश दिनांक व वेळेसह अचूक टिपून घेतले जाऊन ते ज्या विभागाशी संबंधित आहेत त्या विभागांना त्वरीत सूचना देऊन त्यावरील कार्यवाही नोंदवून ठेवण्याची कार्यप्रणाली काटेकोरपणे अंमलात आणावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. कक्षातील हॉटलाईन व संपर्कासाठीच्या दूरध्वनी लाईन्स कायम कार्यान्वित राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. नवी मुंबई महापालिका मुख्यालयाप्रमाणेच विभाग कार्यालये व इतर कार्यालयांमध्येही अशा प्रकारची कार्यप्रणाली अंमलात आणावी असेही आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निर्देशित केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai