Breaking News
समस्या सोडविण्यासाठी अडीच तासांची प्रतिक्षा निष्फळ
मुंबई : नवी मुंबईतील भूखंड वाटपावरील लक्षवेधी मांडताना सिडको, एमआयडीसी आणि शासनात बिल्डरांचे दलाल बसले असल्याचा घणाघाती आरोप आमदार गणेश नाईक यांनी गेल्या आठवड्याच विधानसभेत केला होता. या विषयासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी नाईक यांना चर्चेसाठी बोलाविले होते. मात्र अडीच तास प्रतिक्षेनंतर सभागृहाचे कामकाज स्थगित होताच सामंत परस्पर निघून गेले. यामुळे ताटकळत बसलेल्या गणेश नाईक यांना सरकारच्या सामंतशाहीचा प्रचंड राग आला असल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 महिन्यांपूर्वी आदेश दिल्यानंतरही सिडको नवी मुंबई पालिकेला सामाजिक सेवेचे काही भूखंड हस्तांतरित केले नाहीत. याउलट सिडको मोक्याचे भूखंड विकासकांना विकून मोकळी झाली आहे, असे गंभीर आरोप नाईक यांनी विधानसभेत केले होते. नाईकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अखत्यारितील एमआयडीसीतील भ्रष्टाचाराबाबतही विधानसभेत आवाज उठवला होता. यांचा संताप बघून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्याबरोबर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11 वाजता सामंत यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती. त्यासाठी नवी मुंबई पालिका व सिडकोचे काही अधिकारी उपस्थित होते. नाईक या बैठकीसाठी पावणे अकरा वाजता उपस्थित होते. पण सामंत या बैठकीला वेेळेत आले नाहीत. अडीच तास नाईकांना त्यांची वाट पाहत तिष्टत बसावे लागले. दुपारी एकनंतर सामंत हे विधानसभेत आले व सभागृहाचे कामकाज स्थगित होताच परस्पर निघून गेले. यामुळे गणेश नाईक चांगलेच संतप्त झाल्याची चर्चा मंत्रालयात आहे. पावसात अडकल्याने सामंत हे विलंबाने पोहचल्याचे उद्योगमंत्र्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले असले तरी एमआयडीसीतील भुखंड वाटपाबाबंत विधानसभेत केलेल्या आरोपांबाबत उद््य सामंत यांनी हिशोब चुकता केल्याची चर्चा मंत्रालयात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai