Breaking News
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण 2024 अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असताना या कामात स्वच्छताकर्मींचे महत्वाचे योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सेवाभावी कामाप्रती आदरभाव व्यक्त करीत विष्णुदास भावे नाटयगृह येथे ‘अंधे जहां के अंधे रास्ते' हा विशेष नाटयप्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात खास स्वच्छताकर्मींसाठी आयोजित करण्यात आला होता. स्वच्छताकर्मींच्या जीवनानुभवावर आधारित हे नाटक बघताना उपस्थित स्वच्छताकर्मीं भारावून गेले.
अस्तित्व संस्था, ठाणे संचालित उन्मुक्त कलाविष्कार नाटय समुहाच्या वतीने सादर करण्यात आलेले राज्य नाटय स्पर्धेतील हे विजेते नाटक स्वच्छता मित्र व सफाईमित्र यांच्या जीवनपटाचा वेध घेणारे आहे. त्यामुळे या नाटकाचा प्रयोग अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या पुढाकारातून, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींसाठी आयोजित करण्यात आला होता.
25 कलावंतांच्या संचात सादर झालेल्या या दमदार नाटयाविष्काराने स्वच्छताकर्मींच्या जगण्यावर प्रकाशझोत टाकला. परिसर स्वच्छतेसाठी दररोज परिश्रम करणा-या स्वच्छताकर्मींना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणची अस्वच्छता कमी करुन, घरीच कच-याचे वर्गीकरण करुन, हा वर्गीकृत कचरा कचरागाडंयामध्ये देऊन सहकार्य केले पाहिजे व या माध्यमातून त्यांचे अनाठायी खर्च होणारे श्रम कमी केले पाहिजेत असा संदेश देणा-या या नाटकातून प्रबोधन करतानाच स्वच्छताकर्मींकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याची संवेदनशीलता वाढविली आहे.
अत्यंत जिव्हाळयाच्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे ‘अंधे जहां के अंधे रास्ते या नाटकाच्या लेखिका दिग्दर्शिका ऊर्मी अथात ॲड शिल्पा सावंत यांचा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी उपआयुक्त डॉ गडदे यांच्या समवेत स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai