Breaking News
बेलापूरमध्ये 12 तर ऐरोलीत 2 गृहसंकुलांत केंद्रे
नवी मुंबई : येथील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील जवळजवळ 15 हजार मतदार आपापल्या गृहसंकुलातील मतदान केंद्रांवरच मतदान करणार आहेत. मतदान केंद्राची सुविधा निवडणूक आयोगातर्फे संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या आवारात केली जाणार आहे.
बेलापूर मतदारसंघातील 12 व ऐरोली मतदारसंघातील दोन गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान करण्याची तयारी निवडणूक अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. एकूण चौदा मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या जवळपास 15 हजार इतकी आहे. बेलापूर विधानसभा मतदार केंद्रात 12 गृहसंकुलांमध्ये मतदानाची सुविधा असणार असून तेथे 25 मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत. तर ऐरोलीत दोन गृहसंकुलांमध्ये प्रत्येकी 3 असे सहा मतदान बूथ उभारण्यात येणार आहेत. बेलापूर विभागात एसबीआय कॉलनी, एनआरआय कॉप्लेक्स तसेच एल ॲण्ड टी सीवूड्स येथे मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. एक हजारपेक्षा अधिक मतदार आहेत अशा सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता.
बेलापूर विधानसभा मतदारसंघात 12 सोसायट्यांमध्ये 25 बुथ तयार करण्यात येणार असून तेथील नागरिकांना सोसायटीतच मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमावलीनुसार योग्य ती सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. डॉ. कैलास गायकवाड, सहाय्यक निवडणूक अधिकारी, बेलापूर मतदारसंघ
ऐरोली मतदारसंघात दोन सोसायट्यांमध्येच मतदानाची सुविधा सोसायटीच्या पूर्वपरवानगीने नियोजित केली असून त्या ठिकाणी 2 मतदान बूथ असतील. सोसायटीतील नागरिकांना या ठिकाणी मतदान करता येणार आहे. सुचिता भिकाणे, निवडणूक अधिकारी, ऐरोली मतदारसंघ
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai