Breaking News
नाईक साम्राजाला धक्का देण्याची शिंदेसेनेची रणनिती
नवी मुंबई ः नवी मुंबईवर एकहाती सत्ता ठेवणाऱ्या गणेश नाईकांना धक्का देण्याची रणनिती शिंदेसेनेने आखल्याचे दिसत आहे. बेलापुर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांना पाठिंबा तर ऐरोली मतदार संघात चौगुलेंची बंडखोरी अशी दुहेरी रणनिती आखल्याने महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. त्यामुळे नाईकांसमोर दोनवेळा अपयश पत्करणाऱ्या चौगुलेंना यावेळी तरी नवी मुंबईकर साथ देतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी स्वतःचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी दोन्ही पवार गटांचा अपवाद असून काँग्रेस, उबाठा, शिंदेसेना व भाजप यांनी स्वतःच्या उमेदवारांबरोबरच बंडखोरांनाही रसद पुरवल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापुर मतदारसंघात शिंदेसेनेचे शिलेदार विजय नाहटा व विजय चौगुले यांनी बंडखोरी केल्याने भाजपला सहज जिंकता येणाऱ्या या जागांसाठी आता चुरस निर्माण झाली आहे.
विजय नाहटा हे आमदार म्हात्रे यांची मते खातील या अनुषंगाने विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांनी नुकतीच नवी मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन नाहटा यांचे काम न करता म्हात्रे यांना साथ देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संदीप नाईक यांना आता विजयासाठी खुप पायपीट करावी लागणार असे बोलले जात आहे. शिंदेसेनेने ही रणनिती संदीप नाईक यांना पाडण्यासाठी केल्याचे दिसत आहे. याउलट चौगुले यांनी ऐरोलीतून बंड करुन गणेश नाईक यांच्यासमोरही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वी चौगुले यांनी दोनवेळा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांना ऐरोली येथूनच म्हणावे तसे मतदान न झाल्याने मोठा फटका बसला होता. यावेळी ऐरोली विधानसभा मतदारसंघातील बहुतांश नगरसेवक हे शिंदेसेनेत असल्याने त्याचा फायदा चौगुले यांना होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या तोंडावर चौगुले यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा मुद्दा उचलून धरला होता त्याचाही फायदा चौगुलेंना मिळेल अशी शक्यता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी नाईकांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे तुर्भे स्टोअर येथील सुरेश कुलकर्णी चौगुलेंसोबत असल्याने यावेळी ऐरोली मतदारसंघातही काटे की टक्कर पाहायला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai