Breaking News
डॉ. नेहाली व डॉ. जुईली यांनी रसिकांची मने जिंकली
नवी मुंबई : जालनावाला कला निकेतन, नवी मुंबईद्वारा आयोजित अरंगेत्रम कार्यक्रमात डॉ. नेहाली अनारसे पटेल व डॉ. जुईली कुलकर्णी यांनी भरतनाट्यम नृत्याचे केलेले सादरीकरण रसिकांची दाद मिळवून गेला. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात नुकत्याच संपन्न झालेल्या अरंगेत्रम कार्यक्रमास शास्त्रीय नृत्य प्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. यावेळी या दोन्ही शिष्यांना त्यांच्या गुरु सिंगारमणी अनुराधा जालनावाला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तब्बल अडीच तास चाललेल्या या नृत्य सादरीकरणात डॉ. नेहाली व डॉ. जुईली यांनी आपल्या गुरूंच्या उपस्थितीत वादक व गायकांच्या सोबतीने पुष्पांजली, अलारिपू, नरसिंह कौतुवम, जतीस्वरम, शब्दम, अर्धनारीश्वर स्तोत्रम, भावयामी रघूरामन, वृंदावनी वेणू, तिल्लाना व मंगलम आदी प्रकारातील नृत्य अविष्कार सादर करुन नृत्य प्रेमींची मने जिंकली. भावयामी रघुरामन हि संपूर्ण रामायणावर आधारीत कलाकृती होती. तर वृंदावनी वेणु या संत भानुदासाच्या अभंगात वेणुच्या सुमधुर आवाजाने वृंदावनातले लोक, प्राणीजन जसे मंत्रमुग्ध होतात तसे या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या नृत्यामधील भाव, लय, ताल यांच्या अप्रतिम संगम, कला, गुरुवरील श्रद्धा, समर्पण व सातत्य तसेच अभिनय व नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या मध्यतरानंतर गुरुवर्य अनुराधा जालनावाला यांच्या हस्ते डॉ. नेहाली व डॉ. जुईली या शिष्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच दोन्ही शिष्यांद्वारे गुरु अनुराधा जालनावाला व गौरी पाऊसकर यांचे पूजन करण्यात आले. यावेळी राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी वयाच्या 7 व्या वर्षांपासून भरतनाटम नृत्य कला जोपासणाऱ्या डॉ. नेहाली व डॉ. जुईली यांच्या मेहनतीचे व त्यांच्या नृत्याचे विशेष कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी असलेले डॉ. किरण कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात शिक्षण हे माणसाला कसे जगावे हे शिकवते, तर कला हि माणसाला का जगावे हे शिकवते असे सांगत डॉ. नेहाली अनारसे पटेल व डॉ. जुईली कुलकर्णी यांना भरतनाट्यम हि भारतीय कला संस्कृती जोपासण्यास शुभेच्या दिल्या. यावेळी त्यांनी जालनावाला नृत्य कला निकेतनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी देखील जालनावाला नृत्यकला अकादमीच्या अरंगेत्रम सादरीकरण कार्यक्रमाचे कौतुक करून डॉ. नेहाली अनारसे पटेल व डॉ. जुईली कुलकर्णी यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मानित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नेहालीचे वडील श्रीकांत अनारसे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जुईलीचे वडील कल्याण कुलकर्णी यांनी केले. वैद्यकक्षेत्रात कार्यरत असताना देखील डॉ. नेहाली व डॉ. जुईली यांनी अथक परिश्रम व सातत्य राखून उत्कृष्टरित्या अरंगेत्रम सादर केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai