Breaking News
अजब शिंदेंचा गजब न्याय
नवी मुंबई ः महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध ऐरोली आणि बेलापुर मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या एकाही नेत्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याउलट बंडखोर नेते चौगुले व नाहटा यांच्या सहकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केल्याने शिंदेसेनेत प्रचंड नाराजी आहे. नेत्यांना साथ व कार्यकर्त्यांना लाथ अशी प्रतिक्रिया शिंदेसेनेच्या एका कार्यकर्त्याने आजची नवी मुंबईला दिली.
राज्यात सर्वच पक्षात बंडखोरीने डोके वर काढले असून शिंदेसेनेव्यतिरिक्त सर्वच पक्षांनी बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेत्यांवर व त्यांना साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर कोणतीच कारवाई न केल्याने महायुतीतून त्यांच्या भुमिकेवर उलटसुलट चर्चा सुरु होती. शिंदेसेनेच्या अनेक तुल्यबळ नेत्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये ऐरोलीतून विजय चौगुले, बेलापुरमधून विजय नाहटा, माहिममधून सदा सरवणकर या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांवर कोणतीच कारवाई शिंदे यांनी न केल्याने या बंडखोरीला शिंदे यांची फुस आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे शिंदेसेनेने अखेर कारवाईचा बडगा उगारत नेत्यांना वगळून त्यांच्या कार्यकर्त्यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.
शिंदे यांच्या या अजब कारवाईमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून नेत्यांना एक न्याय आणि नेत्यांच्या कार्यकर्त्यांना दुसरा न्याय यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यातच बेलापुरमधून बंडखोरी करणाऱ्या नाहटा यांच्या कार्यकर्त्यांवर बडतर्फीची कुऱ्हाड पण ऐरोलीमधील कार्यकर्त्यांना अभय असा अजब प्रकार शिंदेसेनेकडून पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेत्यांना साथ आणि कार्यकर्त्यांना लाथ अशी वागणुक देणाऱ्या शिंदेसेनेवर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai