Breaking News
नवी मुंबई ः महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप, डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रात आयोजित जनजागृतीपर विशेष आरोग्य शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी 26 ठिकाणी आयोजित शिबिरांना 13533 नागरिकांनी भेट दिली असून 1312 रक्त नमुने घेण्यात आले आहेत.
या शिबिरांच्या ठिकाणी ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात मॉडलव्दारे दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी संभाव्य डासोत्पत्ती स्थाने दाखविण्यात आली. यामध्ये पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य व टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे, ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच याप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
दि.25/11/2024 ते 22/2/2025 या कालावधीत नागरिकांना डासांचा जास्त त्रास जाणवू नये या उद्देशाने आयुक्त महोदयांच्या निर्देशानुसार डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सकाळच्या नियमित धुरीकरणासोबत सायंकालीन धुरीकरण सुरु करण्यात आले आहे. सकाळचे धुरीकरण हे साप्ताहिक वेळापत्रानुसार नियोजित कार्यक्षेत्रामधील बंद गटारांमध्ये केले जाते तर सायंकालीन धुरीकरण गावठाण, झोपडपट्टी व सोसायटी अंतर्गत मीटर रुम, जिने या ठिकाणी पंधरवडा कार्यक्रमानुसार राबविले जाते. अशाप्रकारची शिबिरे ऑगस्टपासून सातत्याने राबविण्यात येत असून त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभलेला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai