Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या उत्पन्नवाढीकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईने लक्ष देत विशेष कार्यबळाची अर्थात टास्क फोर्स स्थापन केली आहे. ही पाच सदस्यीय समिती महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपाय सुचविणार आहे. त्यामध्ये थकबाकी वसूलीकरिता व विद्यमान वसूलीकरिता नियोजन करुन सोबतच उत्पन्नवाढीचे नवीन स्त्रोत सूचित करणार आहे. याबाबतचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स कार्यरत असणार असून मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मालमत्ता कर विभागाचे उप आयुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण असे चार सदस्य महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियोजन करणार आहेत. उत्पन्नवाढीसाठी उपाय सूचविताना टास्क फोर्सने विद्यमान कार्यपध्दतीमध्ये कोणते बदल करावे लागतील याच्या सूचना कराव्यात व असे बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पध्दतीने व किती दिवसात करता येईल आणि कधीपासून उत्पन्नवाढ होईल हे प्रस्तावात नमूद करावे असे सूचित करण्यात आलेले आहे.
थकबाकी, चालू वसूली व नवीन स्त्रोतामधून अपेक्षित वाढ याचे नियोजन सादर करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय खर्चात बचत ही एक प्रकारे उत्पन्नवाढ असून त्यादृष्टीने आवाजावी खर्च टाळून व आवश्यक तेथे काटकसर करुन खर्चामध्ये किती बचत होईल याचीही माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद आहे. त्यासोबतच शक्य आहे तेथून शासन निधी प्राप्त करुन घेण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि अशी कामे शासन निधीतून करुन महानगरपालिकेचा निधी इतर सुविधा कामांसाठी वापरण्याबाबत सूचना कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे. दुबार योजनांचा शोध घेऊन त्या योजना बंद करण्याबाबत अभिप्राय द्यावेत तसेच इतर महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उत्पन्न वाढीच्या चांगल्या कार्यपध्दती अभ्यासून त्यांचे अनुकरण करण्याबाबत सूचना कराव्यात असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
उत्पन्नवाढीबाबत विविध विभागांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचे सविस्तर अवलोकन करुन टास्क फोर्सने महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीचा विभागनिहाय प्रस्ताव सादर करावा, तसेच त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन करावे आणि त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करावा असे आदेशात सूचित करण्यात आले आहे. महापालिकेस विविध करांतून प्राप्त होणाऱ्या महसुलातूनच विविध नागरी सुविधांची परिपूत केली जात असल्याने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीकडे विशेष लक्ष दिले आहे. आयुक्तांमार्फत प्रत्येक विभागामार्फत होणाऱ्या करवसूलीचा नियमित आढावा घेण्यात येत असतो. आता उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी टास्क फोर्सची स्थापना केली असून या माध्यमातून महानगरपालिकेचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे व त्यातून नवी मुंबईकरांना अधिक उत्तम व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai