Breaking News
1 लाखाहून अधिक दंड वसूली
नवी मुंबई ः शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना राबवितांना प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला प्रतिबंध करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या अनुषंगाने 10 व 11 डिसेंबरला विभागीय कार्यक्षेत्रात धडाकेबाज प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात आल्या असून 1 लक्ष 10 हजाराहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे व 38 किलो 850 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक माल जप्त करण्यात आलेला आहे.
बेलापूर विभागात 5 दुकानावर कारवाई करीत 30 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे व 7 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे. अशाच प्रकारे नेरुळ विभागात 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली व 2 किलो 500 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. वाशी विभागात 2 दुकानदारांकडून 10 हजार दंड वसूली व 2 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिकचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. तुर्भे विभागातही 3 दुकानदारांकडे प्रतिबंधात्मक प्लास्टिक सापडल्याने 8 किलो 200 ग्रॅम एकल वापर प्लास्टिक जप्त करण्यात आले व 15 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. परिमंडळ 1 च्या भरारी पथकानेही 1 किलो एकल वापर प्लास्टिक जप्त करीत 5 हजार दंडात्मक रक्कम वसमूल केली.
अशाचप्रकारे परिमंडळ 2 विभागात उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यात आल्या त्यामध्ये परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 5 हजार दंड वसूली व 700 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले. कोपरखैरणे विभागात 3 दुकानांवर कारवाई करीत 15 हजार दंड वसूली व 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. घणसोली विभागात एका दुकानदाराकडून 6 किलो प्लास्टिक जप्त करुन 10 हजार दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात आली. ऐरोली विभागात एकात दुकानावर कारवाई करत 5 हजार दंडात्मक वसूली व 3 किलो 450 ग्रॅम प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला. दिघा विभागातही 5 किलो प्लास्टिक साठा जप्त करुन 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. सलग दोन दिवस राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमांमध्ये 38 किलो 850 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक सापडले असून त्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा मोठया प्रमाणावर समावेश असल्याचे आढळून आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai