Breaking News
वर्षभरात 654 कारवाया; 939 आरोपींची धरपकड
नवी मुंबई ः अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात नशामुक्त नवी मुंबई या विशेष मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थाच्या विक्रीचे रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमंली पदार्थ विरोधी कक्षाने आणि स्थानिक पोलिसांनी या वर्षांभरामध्ये 654 कारवाया करुन तब्बल 33 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि त्याचे सेवन करणाऱ्या एकूण 939 आरोपीची धरपकड केली आहे. गतवषच्या तुलनेत यावर्षातील अंमली पदार्थाविरोधात झालेल्या कारवाईत 179 ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री होत असल्याचे तसेच या अंमली पदार्थाच्या आहारी शाळा-कॉलेजमधील विद्याथ आणि तरुणवर्ग जात असल्याचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यास पुढाकार घेतला आहे. तसेच नवी मुंबई शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आणि स्थानिक पोलिसांनी या वर्षभरामध्ये शहरातील शाळा, कॉलेज, मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, गार्डन आदि ठिकाणी बारकाईने लक्ष ठेवून विविध ठिकाणी छापेमारी करुन अंमली पदार्थाचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात अंमली पदार्थाच्या एनडीपीएस कलमांतर्गत एकूण 654 कारवाया केल्या आहेत. तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणारे आणि बाळगणारे अशा एकूण 939 आरोपींची धरपकड केली आहे.
सदर कारवाईत तब्बल 33 कोटी 27 लाख रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने 75 कारवाया करुन एकूण 25 कोटी 13 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. तसेच 201 आरोपींना अटक केली आहे. यात 58 विदेशी नागरिकांचा (आफ्रिकन नागरिक) समावेश आहे. उर्वरित कारवाया स्थानिक पोलिसांमार्फत करण्यात आल्या आहेत. गतवष 2023 मध्ये नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्था विरोधात एकूण 475 कारवाया करून सुमारे 23 कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ जप्त केले होते. तसेच 811 आरोपींना अटक केली होती. गतवषच्या तुलतनेत या वर्षाध्ये नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाशी संबंधित कारवायांमध्ये वाढ केल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
नशा मुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत शहरातील अंमली पदार्थाचे रॅकेट उध्वस्त करुन त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा-कॉलेज मधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि उपक्रम देखील नियमित राबविण्यात येत आहेत. अंमली पदार्थासंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडे अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी. सदर माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल. -संदीप निगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, नवी मुंबई
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai