Breaking News
उपचारार्थ वाशी रुग्णालयात दाखल
नवी मुंबई : शहर स्वच्छतेत मोलाचा वाटा असणारे कंत्राटी सफाई कामगारांनी समान काम, समान वेतन या मागणीसाठी गत शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मात्र आठ दिवस उलटून गेले तरी पालिकेने उपोषणाची दखल घेतली नाही. आज (दि. 4) एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असून त्यांना उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे दाखल करण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेत कार्यरत कामगारांना समान काम, समान वेतन मिळावे, अशी सफाई कामगारांची मागणी आहे. या मागणीसाठी वारंवार आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. समान काम, समान वेतन धोरण ठरविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी समिती स्थापना करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. समिती द्वारे देण्यात आलेल्या अहवालामध्ये समान काम, समान वेतन धोरणानुसार वेतन दिल्यास कामगारांचे वेतन कमी होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी आणि सफाई कामगारांच्या मागणीप्रमाणे 2007 साली नियुक्त कायम कर्मचाऱ्यांना आज रोजी मिळणारे वेतन सर्व विभागातील कामगारांना मिळावे, या मागणीसाठी प्रथमतः 27 डिसेंबर 2024 रोजी समता समाज संघटना मार्फत महापालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, या मोर्चाची दखल महापालिका प्रशासनाने न घेतल्याने कामगारांनी अखेर 28 डिसेंबर पासून आमरण उपोषण आंदोलन पुकारले आहे. सात दिवसांनी शुक्रवारी आंदोलन कर्त्या संघटनेच्या शिष्टमंडळास बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. चर्चेदरम्यान आयुक्तांनी सेवा निवृत्त उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. पण कामगार संघटनेस ही बाब मान्य नाही. आठ दिवसानंतरही पालिकेने ठोस निर्णय न घेतल्याने कामगारांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. आज 7 उपोषण कर्त्यापैकी 1 अंकुश धोडीबा वाडकर वय वर्ष 56 यांची तब्येत खालावली असून त्यांना उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे दाखल करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai