Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या 33 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून अधिकारी, कर्मचारी यांच्या अंगभूत कला, क्रीडागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळांचे स्पर्धात्मक उपक्रम यशस्वी रितीने राबविल्यानंतर वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गीत, नृत्य, नाट्य आदी सांस्कृतिक सादरीकरण उत्साहात संपन्न झाले.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित राहून सादरीकरण करणा-या कलावंताचे भरभरून कौतुक केले. कार्यालयात प्रशासकीय कामकाज करताना अशाप्रकारे कलागुणांची जोपासना करून आपण संस्कृती जपण्याचे कामही करीत आहात हे अभिनंदनीय असल्याचे सांगत आयुक्तांनी मराठी भाषेला केंद्र व राज्य शासनामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असून ही भाषा संस्कृती वाढविण्याचे काम आपण करूया असे सांगितले. महानगरपालिकेचे काम जनतेपर्यंत पोहचविण्याचे मोठे काम प्रसारमाध्यमांमुळे होते याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. यापुढील काळात अधिक ऊर्जेने आपण काम करूया आणि नागरिकांना तक्रार करण्याची संधी मिळणार नाही अशाप्रकारे गुणात्मक सेवासुविधा पुरविण्यासाठी कटिबध्द राहूया असे आवाहन त्यांनी केले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी शेरोशायरीची बरसात करीत जिंदादीलपणे सादर केलेल्या 2 बहारदार गाण्यांनी कार्यक्रमाची उंची वाढविली. समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, शिक्षणाधिकारी अरूणा यादव या अधिकाऱ्यांनीही टाळ्यांची दाद घेत कलात्मक सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये 25 वैयक्तिक गायन, 5 समुह गायन, 10 वैयक्तिक नृत्ये, 9 समुह नृत्ये व 3 नाटिका अशाप्रकारे अप्रतिम कलाविष्कार अधिकारी कर्मचारीवृंदाने जल्लोषात सादर केले. यावेळी महानगरपालिकेचे विभागप्रमुख व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai