Breaking News
नवी मुंबईः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी 2025 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे उत्साही आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मराठी भाषेची समृध्द परंपरा सांगणारे विविध कार्यक्रम आयोजना सोबतच पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रतिभागुणांना वाव देणारे विविध साहित्यिक स्पर्धात्मक उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
यामध्ये पहिले व्याख्यानपुष्प गुंफताना शासकीय कामकाजात सुयोग्य मराठी भाषेचा वापर या अनुषंगाने शासनाचे सेवानिवृत्त उपसचिव वसंत चौधरी यांचे ‘कार्यालयीन टिप्पणी व मराठी सुलेखन’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. त्यांनी अत्यंत सोप्या पध्दतीने नस्तीचे स्वरुप, प्रशासनिक लेखन, टिप्पणीलेखन, पत्रलेखन, कार्यालयीन कागदपत्रे मांडणीची सहा गठ्ठे पध्दती तसेच अभिलेखाचे वगकरण अशा विषयांवर सविस्तर माहिती दिली.
शासनाकडील पत्रव्यवहाराचे निरनिराळे प्रकार सांगत त्यावरील सुयोग्य कार्यवाहीविषयी विवेचन केले. परिपूर्ण नस्ती कशी असावी हे सांगताना त्यांनी टिप्पणी व पत्रलेखनाच्या तांत्रिक बाजूंविषयी सविस्तर भाष्य केले तसेच पत्राचा मसुदा कसा असावा याविषयीही मार्गदर्शन केले. कार्यालयातील सहा गठ्ठे मांडणी पध्दतीचे वैशिष्टये विशद करीत त्यांनी कार्यालयातील अभिलेखाचे अ,ब,क,ड स्वरुपात संग्रहणाचे महत्व सांगितले व कागदपत्रांच्या तत्पर उपलब्धतेच्या अनुषंगाने कार्यपध्दतीची गरज सांगितली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai