Breaking News
वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला विश्वास
नवी मुंबई : दि.बा.पाटील एक दिशादर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांचे कार्य फार मोठे होते अशी भावना वनमंत्री गणेश नाईक यांनी दि. बा. पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव लागणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भारतातील शेतकऱ्यांचे आणि प्रकलपबाधितांचे कैवारी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या 99 व्या जयंती निमित्ताने 13 जानेवारी रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिबांच्या संघर्षमय, जीवनाचे चित्रप्रदर्शन, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, जेष्ठ नागरिक, कचरावेचक भगिनी, कर्तव्यदक्ष महिला रिक्षा चालक भगिनी सत्कार, पाणपोई लोकार्पण आणि अन्य उल्लेखनीय सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे विविध सामाजिक उपक्रम नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आणि इतर सामाजिक संस्थांच्या वतीने राबविण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांंची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बां.चे नाव लागणार हा मला विश्वास आहे. कारण नामकरण चळवळ ही सर्वांनीच जिद्दीने मनावर घेतली आहे, लवकरच याबाबतीत राज्य आणि केंद्र स्तरावर शासकीय सोपस्कार पार पडून येत्या काही महिन्यांतच जनभावनेचा आदर करून निर्णय होईल,’ असे नाईक म्हणाले.
दशरथ भगत म्हणाले की, दि. बा. पाटील यांनी संघर्ष करून पिडीतांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पीडित घटकांच्या न्यायासाठी चळवळ निर्माण करणे आवश्यक आहे. दिबांसारखे जन्म घेऊन आपले आयुष्य बाधितांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचणारे चळवळकार निरंतर आणि चिरंतन निर्माण होऊन चळवळी जिवंत राहिल्या पाहिजेत, असे या कार्यक्रमाच्या आयोजनामागील मुळ उद्दिष्ट असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.
महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन प्रबोधन प्रतिष्ठान द्वारे उरण येथेही “हुतात्मा बलिदान दिनाचे“ आयोजन केले होते.यावेळी माजी खा. रामशेठ ठाकुर, खा.श्रीरंग बारणे, आ.प्रशांत ठाकुर, आ. महेश बालदी, माजी खा.डॉ. संजीव नाईक, विधानपरिषद सदस्य विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, समाजसेवक प्रीतम म्हात्रेे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai