Breaking News
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; प्रश्न सोडवण्याची विनंती
पनवेल : सिडकोच्या निरनिराळ्या विभागांतील लिपिक, टंकलेखक, वाहक, शिपाई तसेच अग्निशामन दल विभागात 350 कर्मचारी मागील 14 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत. यातील बहुतांश कर्मचारी हे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त असून, भत्ते नाकारल्याने त्यांनी मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून गुरुवारी बेलापूरच्या अर्बन हाट येथे आंदोलन केले. या कर्मचाऱ्यांच्या समस्या आमदार मंदा म्हात्रे यांनी जाणून घेऊन सिडको सहव्यवस्थापकीय संचालकांशी बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली.
विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस एजन्सीतर्फे ठेका पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन व इतर मागण्यांसाठी युनियनचे उपाध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनात आंदोलन पुकारले होतेे. किमान वेतन अधिनियम, 1948 च्या तरतुदीप्रमाणे वेतन, भत्ते व इतर सेवासवलती देणे बंधनकारक असताना, या कर्मचाऱ्यांना दुकाने व व्यापारी आस्थापना या उद्योगांतील कामगारांप्रमाणे चुकीच्या पद्धतीने कमी वेतन दिले जात असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करून ठेकेदाराने ही रक्कम भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयात जमा केलेली नाही. अशा प्रकारे गेले 18 महिने या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेली लाखो रुपयांची रक्कम या ठेकेदाराने भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात भरली नसून, या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.
सिडको भवन समोर पुकारलेल्या ‘एक दिवस धरणे आंदोलनास’ आमदार मंदा म्हात्रे यांनी उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकुन घेतल्या. तसेच सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कडले यांच्या दालनात आ. म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासह बैठक घेतली. सदर कर्मचाऱ्यांचा मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात यासाठी आ. म्हात्रे यांनी विनंती केली. यावेळी समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील असे आश्वासन सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कडले यांनी दिले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai