Breaking News
नवी मुंबई ः मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त नवी मुंबई पालिकेच्या अधिकारी, कर्मचारीवृंदामधील काव्यप्रतिभेला उत्तेजन मिळावे यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या स्वकवितावाचन स्पर्धेत 31 कवींनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.
सहभागी 31 कवींच्या कवितांच्या सादरीकरणानंतर परीक्षक म्हणून संवाद साधताना कविवर्य ‘बी’ यांचे नातू कवी अशोक गुप्ते यांनी उत्तम कवितेचा ध्यास घेऊन लिहीत राहिले पाहिजे असे सांगितले. आपल्या दैनंदिन कामात व्यस्त राहूनही स्वत:मधील काव्यगुणांना उत्तेजन देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी कवींचे तसेच या कवींना अशा स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या गुणग्राहकतेची त्यांनी प्रशंसा केली. विशेषत्वाने महिला कर्मचारी स्वत:चा संसार, नोकरी असा व्यस्त दिनक्रम सांभाळून कवितेचे मनात रुजलेले बीज प्रतिभेचे खतपाणी घालून फुलवतात याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कविता लिहिण्याप्रमाणेच कवितावाचन स्पर्धा असल्याने तिच्या सादरीकरणाकडेही विशेष लक्ष द्यायला हवे अशा सूचना करतानाच त्यांनी कविता मुक्तछंदातील असली तरी तिला स्वत:ची अशी लय असावी हे आवर्जून सांगितले. विविध स्पर्धांतून भाग घेत रहा आणि चांगली कविता ऐकत व लिहित रहा अशा शुभेच्छा कवी अशोक गुप्ते यांनी याप्रसंगी दिल्या. आपल्या काही बहारदार कवितांचे सादरीकरणही त्यांनी याप्रसंगी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai