Breaking News
महिला शेतकरी उत्पादकांचे एक दिवसीय संमेलन
नवी मुंबई : राज्यभरात उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य व थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या उत्पादनांना योग्य नफा मिळावा, या उद्देशाने वाशीतील सिडको कन्व्हेन्शन सेंटर मध्ये बुधवारी खरेदीदार आणि विक्री करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्याचे महालक्ष्मी ट्रेड सरस हे एक दिवसीय संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनामध्ये विविध कंपन्यांचे 25 खरेदीदार व 70 महिला शेतकरी उत्पादकांनी सहभाग नोंदवला. या संमेलनात खरेदी विक्री मधून दिवसभरात एकूण 1.70 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
या समेलनाचे उद्घाटक म्हणून उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांच्यासह मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, उपसंचालक संदीप जठार,अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक मनोज शेटे यांच्यासह एफडीआरव्हीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन बिहारी आणि वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव यांची प्रमुख उपस्थिती होती. एक दिवसीय महालक्ष्मी ट्रेड सरसच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उमेद अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच ई-कॉमर्सच्या माध्यमातून महिला उद्योजकता वाढवण्यासाठी नव्या संधी निर्माण करुन महिला सक्षमीकरणासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रात सध्या 450 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीसी) सक्रिय असून आतापर्यंत 5 लाख स्वयं सहाय्यता समूहांना जवळपास 1 हजार कोटींचा समुदाय निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. बँकांमार्फत ग्रामीण महिलांना 30 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून महाराष्ट्रात 19 लाख लखपती दीदी अभियानाने तयार केल्याचेही सागर यांनी स्पष्ट केले.
उमेद अभियान हे फक्त ग्रामीण महिलांसाठी आर्थिक मदतीचे साधन नाही, तर त्यांना सन्मान देणारे आणि त्यांच्या कर्तृत्वाला वाव देणारे व्यासपीठ आहे. उमेद अभियानाचे उद्दिष्ट ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना जागतिक बाजारात पोहोचवणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आहे. या अभियानाद्वारे ग्रामीण महिलांचे यश भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवा आयाम ठरणार असल्याचे मत अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai