Breaking News
17 गुन्ह्यांची उकल; 12 रिक्षा आणि एक स्कुटी हस्तगत
नवी मुंबई ः ऑटो रिक्षा आणि स्कुटी चोरणाऱ्या 2 सराईत आरोपींना सीबीडी पोलिसांनी अटक करुन त्यांनी मुंबईसह नवी मुंबईत केलेल्या 17 गुन्ह्यांची उकल केली आहे. अशरफ आलम शेख (21) आणि रमजान अब्दुलमतीन शेख उर्फ पापा (22) अशी या दोघांची नावे असून सीबीडी पोलिसांनी या आरोपींनी चोरलेल्या एकूण 12 ऑटो रिक्षा आणि एक स्कुटी हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी काही दिवसापूवच ऑटो रिक्षा चोरी प्रकरणात जेलमधुन सुटून आला होता.
सदर कारवाईत अटक करण्यात आलेल्या अशरफ आणि रमजान या दोघांनी 5 जानेवारी रोजी सीबीडीतील आयकर कॉलनी भागातून ॲक्टिवा स्कुटी चोरली होती. याबाबत सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश रेवले, पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश डांबरे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघ आणि त्यांच्या पथकाने दिवस-रात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळ आणि आजुबाजुच्या परिसरातील सुमारे 50 ते 55 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. या तपासणीत सीबीडी-बेलापूर मधील टाटानगर झोपडपट्टीत राहणारे अशरफ शेख आणि रमजान शेख उर्फ पापा या दोघांचा स्कुटी चोरी प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांनी चोरलेली ॲक्टीव्हा स्कुटी हस्तगत केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी नवी मुंबईतील सीबीडी, खारघर, कळंबोली, उलवे, वाशी, पनवेल शहर, तसेच मुंबईतील नेहरुनगर, पंतनगर, बांद्रा आणि खार या परिसरातून ऑटो रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन चोरलेल्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या चोरीच्या एकूण 12 ऑटो रिक्षा हस्तगत केल्या. यातील एका आरोपीने खारघरमध्ये शारिरीक दुखापतीचा गुन्हा केल्याचे देखील उघडकीस आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai