Breaking News
नवी मुंबई ः मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालयाचे ई-ग्रंथालय, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्या सहभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त साधना जोशी यांच्या बहिणाबाई आणि अध्यात्म या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी बहिणाबाईंचे अनेक माहित नसलेले पैलू उलगडले आणि रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात शब्दसुमनांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. वाचन संस्कृती कमी होत चालल्याने असे संवर्धनाचे पंधरवडे साजरे करावे लागतात. मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे. वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे बाल वयातच मराठी भाषेचे संस्कार झाले तर मराठी ज्ञानभाषा होण्यास मदत होईल. असे मत मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकण यांनी मांडले.
पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे निवेदन करणाऱ्या जोशी आज आपल्या समवेत असल्याचा विशेष आनंद रसिकांना होता. व्याख्यानाचा विषय होता बहिणाबाई आणि अध्यात्म. आपल्याला माहिती असलेल्या बहिणाबाई म्हणजे खोप्यामध्ये खोपा आणि संसार संसार तसा तवा चुल्यावर पण जोशींनी आपल्या व्याख्यानातून अनेक माहीत नसलेले बहिणाबाईंचे पैलू उलगडले. त्यांच्या स्वभावातली निरागसता आणि त्यांच मन लहान मुलाच्या मनासारखे जपल्याचे अधोरेखित केले. नावात काय?असं म्हणताना बहिणाबाई म्हणजे बहीण आणि आई हे जगातलं सुंदर नातं तिच्या बहिणाबाई नावात दडले आहे. अध्यात्म म्हणजे जीवन जगताना सरळ मार्गाने चालायचं कुणाचे अध्यात न पडणं म्हणजे अध्यात्म. निसर्गाची लिपी समजलेली, न वाचता, न वाचलेली त्यांची लिपी शब्दांची गुंफण करुन गाण्यात बांधणारी निसर्ग कन्या म्हणजे बहिणाबाई. जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे विचार शब्दबद्ध करणारी बहिणाबाई. बहिणाबाई शिकलेल्या नव्हत्या हे सर्वश्रुत आहे. तुकाराम महाराज म्हणतात जगण्याच्या प्रत्येक क्षणात स्वतः मधले लहान मुल जागे ठेवणे म्हणजे अध्यात्म. मूलं जन्माला येतात त्यावेळी त्याच्या दोन्ही मुठीत आनंद आणि सुख समाधान ठासून भरलेल असत पण जेव्हा मूल मोठे होऊ लागतं तशा मुठी हळूहळू उघड्या होत असताना आनंद, समाधान सुख सारं काही निसटून जातं. हळूहळू हात मोकळे होतात. लहान मुलं कोणाच्याही सुखदुःखात मिसळून जात असते कारण ते निरागस आणि निर्लेप मन असते. लहान मूल मनात ठेवून बहिणाबाई जगली. असे अनेक पैलू उलगडताना हसत खेळत कार्यक्रमाची सांगता झाली. वक्तृत्वाचा जोश असेल आणि शब्दांची साधना करण्याची वृत्ती असेल तर अशा व्यक्तिमत्वाचे नाव साधना जोशीत असू शकतं त्याची प्रचिती रसिकांनी यातून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली बापट यांनी केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai