Breaking News
नवी मुंबई : कोपरखैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राज्यपाल यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, वेळ, नियोजन याचे महत्व पटवून देऊन मार्गदर्शन केले.
रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल सेंट मेरीज स्कुलचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या कर्क रुग्ण सेवा, एचआयव्ही - एड्स रुग्ण सेवा, अनाथ मुलींचे शिक्षण आदी क्षेत्रातील सेवाकार्याचे कौतुक केले. सेंट मेरीजच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तम प्रदर्शनाचे कौतुक करताना खेळ व शिस्त यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते असे राज्यपालांनी सांगितले. शिक्षण मिळवून धनसंपदा अर्जित करणे योग्यच आहे. मात्र केलेल्या धनसंचयाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करावा असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. शाळेत वेळापत्रक महत्वाचे असते तसेच वेळापत्रक जीवनात देखील पाळले गेले पाहिजे कारण त्यातून वेळेचे चांगले नियोजन करता येते, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांचे हस्ते शाळेचे आजी - माजी समिती सदस्य, माजी प्राचार्य तसेच कला, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रेसी मॅथ्यूज, आशा नारायण, जलतरणपटू तोषला भिरूड, बाल वैज्ञानिक अर्श चौधरी, माजी विश्वस्त जेकब वगस, जॉन मथाई, के ए थॉमस, फुटबॉल पटू निल थॉमस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्चच्या मुंबई धर्मप्रांताचे मुख्य बिशप गीवगस मार कुरीलोस, मुंबई मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्च परिषदेचे सचिव थॉमस चाको, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फादर एब्राहम जोसेफ, शाळेच्या प्राचार्या ब्लेसी मॅथ्यूज, उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यूज, विश्वस्त तसेच आजी माजी प्रशासक, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्याथ व निमंत्रित उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai