Breaking News
रहस्य कथेचा खरा नायक असलेल्या, 1200 कादंबर्या लिहून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या रहस्य कथाकार गुरुनाथ नाईक यांचा रहस्यमय मृत्यू होणे मनाला चटका लावणारे आहे. ते मूळचे गोव्याचे होते त्यांचे पुण्यात निधन झाले. शेवटच्या दिवसात त्यांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले हे खरेतर दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांनी काही वर्षे लातूर येथे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या सांगण्यावरून दैनिक एकमतचे संपादक म्हणून काम पाहिले होते. सुरुवातीचा काळ होता, नाईक साहेब यांची ओळख झाली आणि मी त्यांचा कौटुंबिक मित्र झालो. मला महिन्यानंतर समजले की हाच तो माणूस आहे ज्यांनी 1200 कादंबर्या लिहिल्या आहेत. बाबुराव अर्नाळकर यांच्या बरोबर त्यांचे लेखन होते. खरं तर खूप सार्या आठवणी नाईक साहेबांच्या आहेत. पहिली एकमतची ऋतुरंग नावाची पुरवणी मी आणि त्यांनी मिळूनच सुरू केली होती ते टोपण नावाने लेखन करायचे.
गुरुनाथ नाईक हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा/कादंबरीकारांपैकी एक असून बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनी सुद्धा हजारांवर रहस्य कादंबर्या लिहिल्या व एका मोठ्या चाहत्या वर्गाला खिळवून ठेवले. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होय. प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे विष्णू नाईक यांचे जवळचे मित्र. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले. नाईक यांच्या घराण्याला स्वातंत्र्य लढ्याचीही पार्श्वभूमी आहे. साखळीच्या राणे घराण्याने पोर्तुगीजांविरुद्ध 17 बंडे पुकारली होती. नाईक यांचे आजोबा लेफ्टनंट होते. 1901 मध्ये त्यांनी बंड पुकारले. 1903 मध्ये बेसावध असताना त्यांना अटक झाली. पोर्तुगीजांनी त्यांना 28 वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांची रवानगी तिमोर बेटावर केली. यावेळी गुरुनाथ नाईक यांच्या आजी गरोदर होत्या. त्याही पोर्तुगिजांविरुद्ध काम करणार्या संघटनेच्या प्रमुख होत्या. पोर्तुगिजांचा ससेमिरा चुकवित त्या साखळीत राहण्यास आल्या. त्यांनी नाईक हे नवीन नाव धारण केले. तेव्हापासून या घराण्याला नाईक हेच आडनाव लागले.
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे 1957 ते 1963 या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.
1970 साली कामानिमित्त पुण्यात आले आसताना त्यांना सदानंद प्रकाशनचे खाडिलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले आणि ते कामाला लागले. नेमका त्याच काळात ते पुण्यातील अलका चित्रपटगृहात ‘किस द गर्ल्स अॅन्ड मेक देम डाय’ हा इंग्रजी चित्रपट पहायला गेले. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन’ ही पहिली रहस्यकथा लिहून काढली. सकाळीच ही कथा त्यांनी खाडिलकरांना सोपविली. घरी परतल्यावर ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ’ ही दुसरी रहस्यकथा तयार झाली. तीही खाडिलकरांना सोपवून ते बेळगावला निघून गेले. थोड्याच दिवसात खाडिलकरांचे पत्र आले. तुमच्या आणि गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कादंबर्या छापत आहोत, कृपया निघून यावे, आणि गुरुनाथ नाईक रह्स्य कादंबरीकार झाले. नाईक यांच्या कादंबर्यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते 7-8 कादंबर्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत. या कादंबर्या सरासरी शंभर पानांच्या असायच्या. अर्नाळकरांच्या कादंबर्याही 100 पानांच्या असत. 1970 ते 1982 या काळात त्यांनी 724 रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील 250 शिलेदार कादंबर्या आहेत. गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा साकारून त्याच्या भोवती 150 कथा लिहिल्या. कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणार्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.
गोलंदाज-उदयसिंह राठोड शिलेदार-कॅप्टन दीप, शब्दवेधी-सुरज,गरुड-मेजर अविनाश भोसले, रातराणी-रजनी काटकर, बहिर्जी-बहिर्जी नाईक, सागर-जीवन सावरकर, अजिंक्य योद्धा, अंधा कानून, अंधाराचा बळी, अफलातून, आसुरी, कायदा, कैदी नं. 100, गरुडभरारी, गोलंदाज, झुंज एक वार्याशी, तिसरा, डोळा, दिल्लीचा ठग, देहान्त, धगधगती, सीमा, प्रलय, बळी, भयानक, मृत्यूकडे नेणारे चुंबन, रणकंदन, रणझुंज, सरळ चालणारा खेकडा, सवाई, सुरक्षा, हर हर महादेव, हादरा, हिरवे डोळे अशा चतुरस्त्र लिहिणार्या नाईक साहेबांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. इतकं साहित्य लिहून सुद्धा झोळी फाटकीच राहिली हे दुर्दैव. दोन चार पुस्तके लिहून मिरवणार्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या साहित्यिकांनी याचा विचार करायला हवा. हा माणूस कधी रुसला नाही, फुगला नाही. कधी व्यासपीठावर बसण्यासाठी धडपडला नाही की कुठल्या राजकीय लोकांना शरणही गेला नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai