Breaking News
देशात पाच राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुकांमुळे संपूर्ण देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली मतदारांचे धर्माच्या आधारावर ध्रुवीकरण करून मतदान पदरात पाडून घेण्याचा नवा पायंडा भारतीय जनता पार्टीकडून अवलंबला जात आहे. ज्या रामाच्या नावाखाली रामराज्याची संकल्पना मांडून देशात रामराज्य साकारण्याचे स्वप्न भारतीयांना दाखवले जात आहे, त्याविपरीत भाजप हिंदू मतदारांचे ध्रुवीकरण करून मतदान मागत असल्याने देशाच्या संघीय ढाच्याला तडा जातो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. हिंदू-मुस्लीम आणि इतर धर्माच्या विरोधात हिंदूंमध्ये प्रचार करून ध्रुवीकरण करत असल्याने ज्या संस्कारावर भारतीय समाज हजारो वर्ष आपले जीवन व्यतीत करत आला आहे त्यास तिलांजली देऊन बेगडी हिंदुत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेणार तर नाही ना? त्यामुळे राजकारण धर्मावर भाजपचे धर्माचे राजकारण हावी ठरते की काय याचे उत्तर पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यावरच दिसेल.
राजकारण आणि धर्म या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. समाज्याच्या उन्नतीसाठी आणि हितासाठी राजा हि संकल्पना मांडण्यात आली. राज्याच्या माध्यमातून कायदे बनवून त्याच्या अधिपत्याखालील अधिकार्यांमार्फत कायद्याची अंमलबजावणी आणि समाजाची सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात आले. या देशात अनेक चक्रवर्ती राजे होऊन गेले त्याचा उल्लेख पौराणिक कथांमध्ये आढळतो. राजाने आपले जीवन कसे जगावे, सामाजिक उत्तरदायित्व कसे निभवावे, विविध पंथात-जातीत आणि धर्मात सलोखा निर्माण करून राज्यशकट हाकणे याबाबत त्यांना धर्माचे मार्गदर्शन होत असे. भारताच्या इतिहासात राजा राम याचा कार्यकाळ हा अतिशय आदर्श मानला जातो. रामाने घालून दिलेल्या आदर्शावरच प्रत्येक राजकर्त्याने आपले राजकारण करून समाजाचा सर्वांगीण विकास करावा अशी अपेक्षा भारतीयांकडून व्यक्त होते. भारतीयांच्या मनावर हजारो वर्ष असलेला रामाच्या चारित्र्याच्या पगड्याचा वापर मात्र आताच्या राजकर्त्यांकडून धूर्तपणे केला जात असून रामराज्याचे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात रावणालाही लाज वाटावी असे वर्तन राजकर्ते करत आहेत.
धर्माची संकल्पना हि मनुष्याच्या वैयक्तिक उत्थानसाठी आणि समाजाच्या मार्गदर्शनासाठी मांडण्यात आली. त्या अनुषंगाने चार वेदांची निर्मिती करण्यात येऊन मनुष्याला जाणवणार्या सर्व विषयांना दिशा देण्याचा प्रयत्न या वेदांच्या माध्यमांतून करण्यात आला. वेद कोणी लिहिले किंवा कोणी सांगितले या तांत्रिक बाबींमध्ये न जाता त्याची मनुष्य आणि समाजाला उपयुक्तता किती या आधारावरच त्याची महत्ता ठरवायला हवी. भगवतगीता, वेद-उपनिषिद्धे यांतील तत्वज्ञानाचा अभ्यास, मार्गदर्शन आणि भारतीयांचे जीवनातील आचरण यामुळे संपूर्ण जगाला दिशा दाखवण्याचे काम आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून केले. आजही ऋषीमुनींनी लिहिलेले ग्रंथ आधुनिक विज्ञानाचा पाय ठरले आहेत. या विज्ञानाच्या वाहणार्या अखंड गंगेतूनच तक्षशिला आणि नालंदासारखी विश्वज्ञानपीठे उभी राहिली. विश्वगुरु हि उपाधी भारताला याच ज्ञानापीठमुळे मिळाली. मग ज्ञानार्जन करण्यासाठी जगाच्या कानाकोपर्यातून विद्वान भारतात येऊ लागले. मध्यंतरीच्या काळात जाणीवपूर्वक याचा अभ्यास फक्त विशिष्ट समाजापुरता मर्यादित ठेवण्यात आल्याने भारतीयांचे अतोनात नुकसान झाले. वेद उपनिषिद्धांचा अर्थ चुकीचा लावून राजव्यवस्थेलाही वैचारिक गुलाम बनवण्यात आले. नको त्या वर्णव्यवस्थेत देश भरडला गेला आणि त्याची किंमत आजही भारतीय देत आहे.
धर्माधिष्ठित राजकारणाची मोठी किंमत भारतीयांनी चुकवून 1947 साली देशाने स्वातंत्र्य प्राप्त केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाने विज्ञानाची कास पकडली. गेली सत्तर वर्ष राजकीय नेतृत्वाने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन अनेक धर्म, जातिपातीत विखुरल्या गेलेल्या समाजाला एकत्र गुंफून विकासाचा मार्ग चोखाळला. ज्या देशात साधी सुई बनत नव्हती त्या देशात आज ब्राह्मोस सारखे मिसाइल्स बनवण्याची प्रगती साध्य केली. तत्कालीन सरकारच्या आर्थिक नितीमुळे आणि देशवासीयांच्या परिश्रमामुळे भारत आज जगातील सहावी अर्थव्यवस्था बनली असून अनेक आघाड्यांवर देशाने प्रगती साधली आहे. 1984 साली तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी देशात आणलेल्या माहिती आणि तंत्रज्ञान युगातील क्रांतीने भारतातील तरुण शिक्षण घेऊन विदेशात आपला ठसा उमटवत आहेत. जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे मुख्य अधिकारी पदावर ते कार्यरत आहेत. अनेक क्षेत्रात आपण साध्य केलेला विकास हा फक्त देशातील सामाजिक शांतता आणि विज्ञानाचा चोखाळलेला मार्ग यामुळेच सध्या झाला आहे. भारत जगात पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्याचे स्वप्न पाहत आहे ते पूर्वीच्या राजकर्त्यांनी दूरदृष्टीने अवलंबलेल्या नीती आणि धोरणामुळे. परंतु सध्या या देशात पुन्हा सुरू झालेला धार्मिक उन्माद पाहता भारतीय इतिहासाची चाके पुन्हा उलटी फिरवतात की काय? अशी शंका उपस्थित करतात.
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा धर्माने डोके वर काढले असून माझा धर्म विरुद्ध त्याचा धर्म अशा पद्धतीने प्रचार करण्यात येत आहे. ज्या-ज्या वेळी धर्म हा राजकारणावर हावी ठरतो त्यावेळी देशाची अधोगती झाली हे निश्चित. त्याचा प्रत्यय आपण यापूर्वी घेतला आहे आणि आता अरब देशांमध्ये सुरू असलेल्या धार्मिक युद्धावरून लक्षात येईल. स्वतःच्या धर्म स्थापनेसाठी दुसर्या धर्माची अवहेलना करणे म्हणजेच आपण सामाजिक अशांततेला आमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यापेक्षा या धार्मिक वादात न पडता समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कोणता राजकीय पक्ष त्यांची ध्येय धोरणे निश्चित करतो आणि त्या अनुषंगाने काम करतो यावरच मतदान करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर राजकारणातील गुन्हेगारांना मतदान न करता जात-पात आणि धर्म विसरून चांगल्या उमेदवाराला मतदान करणे गरजेचे आहे. कोणत्याही पक्षाच्या धार्मिक प्रचाराला बळी न पडता समाज आणि राष्ट्रहित कशात आहे याचा विचार करून मतदान करणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य आहे. धार्मिकतेला आवर घालून रामाच्या नावाचा बाजार मांडून सत्तेचे श्रीखंड ओरबाडणार्याला घरी बसवून राजकारणातील सामाजिक धर्म सांभाळणार्यांना निवडण्याची हीच ती वेळ आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे