Breaking News
नवाब मलिक, अनिल देशमुख, संजय राऊत, विवेक पाटील यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या इडीने आता आपला मोर्चा कागलचे विद्यमान आमदार, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर वळवला आहे. मुश्रीफ यांच्यावरील कारवाई 2019 मध्येच व्हायची होती. पण गजहब झाल्याने ती टळली. भाजपात प्रवेेश घेण्यासाठी मुश्रीफ यांच्यावर प्रचंड दबाव होता. राष्ट्रवादीतील रथी महारथी इडीच्या संभाव्य कारवाईला घाबरून भाजपवासी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी भाजपच्या आधीन व्हावं असा प्रयत्न भाजप नेत्यांचा आणि त्यात तो फडणवीसांचा होता. एक मुश्रीफ कोल्हापूर हाती यायला पुरेसे आहेत हे लक्षात घेऊन हा प्रयत्न सुरू होता. त्याला मुश्रीफ यांनी अजिबात थारा दिला नाही. उलट फडणवीसांना खडेबोल सूनवत मुश्रीफ यांनी त्यांना उताणे पाडले होते. तेव्हापासूनच चौकशांचा ससेमिरा मुश्रीफ यांच्या मागे लावण्यात आला होता. वर्षभरापूर्वी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी पहिली धाड टाकत मुश्रीफ यांना कारवाईची हिंड दिली होती. त्या धाडसत्रात काहीही हाती न लागल्याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना हात हलवत परतावं लागलं होतं. आता पुन्हा चौकशा लावून भाजपने आपलं काम सुरू केलं आहे.
सुमारे 41 वर्षांहून अधिक काळ मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. महाविकास आघाडी सरकारच्याही काळात मंत्रीपदी वर्णी लागलेले मुश्रीफ हे आघाडीतील खंबीर नेते असल्याने त्यांना जखडून ठेवल्याशिवाय कोल्हापुरात पर्याय नाही, याची जाणीव भाजपला आहे. यामुळेचं मुश्रीफ यांना अडकवण्याचा भाजपचा डाव स्पष्ट दिसतो आहे. कागलचे पहिले लोकनियुक्त उपनगराध्यक्ष मियालाल (बापुजी) मुश्रीफ याचे चिरंजीव म्हणजे हसन मुश्रीफ. कागलच्या हिंदुराव विद्या मंदिरातून प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुश्रीफ यांनी 1974 मध्ये शिवाजी विद्यापीठातून बी.ए. ची पदवी घेतली. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी घराची संपूर्ण जबाबदारी मुश्रीफ यांच्यावर आली. याच दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर 85 च्या दरम्यान ते राजकारणात सक्रीय झाले. राजकारणात आल्यापासून मुश्रीफ यांची कमान चढतीच होती. कार्यकर्ता ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशी पदे आत्मसात करत मुश्रीफ यांनी राजकारणाची सुरूवात केली.
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून आजवर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम आहेत. पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री अशा 67 वर्षीय मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास सुरू आहे. हा प्रवास म्हणजे कोल्हापूरची ताकद आहे. स्वतः मुस्लीम असूनही त्यांनी कधी धर्माचा स्तोम माजवला नाही. दर्गा मशिदीत काम करायचं असेल तेव्हा मंदीर गुरुद्वाराही सजला पाहिजे हा त्यांनी मूलमंत्र जपला. असा कार्यकर्ता लाभणे ही भाजपसाठी कमाईच होती. ती हाती यावी यासाठी मार्ग मात्र अघोरीच.
सदाशिवराव मंडलिक खासदार झाल्यानंतर कागलच्या जागेसाठी अवघ्या एका वर्षासाठी पोटनिवडणूक झाली. यावेळी मुश्रीफ यांना विधानसभेसाठी पहिली संधी मिळाली. मात्र पहिल्याच निवडणुकीत मुश्रीफ यांचा सात हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. पुढे वर्षभरात त्यांनी राजकारणात चांगला जम बसवला. त्यानंतर ते साडेतीन हजार इतक्या मताधिक्याने विधानसभेत निवडून गेले. दुर्गम वाड्या वस्त्यांत विकासकामं, जिल्ह्यात रस्ते पाणी यांच्या योजना अशा कामामधून मुश्रीफ यांनी जनमानसात वेगळा ठसा उमटवला. मुश्रीफ यांनी स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून राजकीय कारकीर्द घडवली आहे. धडाडीचा कार्यकर्ता अशी सुरूवात केलेल्या मुश्रीफांना संघर्षाची सवय आहे. मुश्रीफ यांच्यावर आजवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. सध्याच्या राजकारणात मुश्रीफ यांच्या बाबतीत असं होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातून फारसं काही हाती लागेल असं चित्र नाही. जिल्ह्याच्या राजकारणावरही मुश्रीफ यांची चांगली पकड आहे. कागल मतदारसंघात घरोघरी निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात मुश्रीफ यांनी यश मिळवलं आहे. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संस्था ही सत्ताकेंद्र आघाडीकडे असण्याचं श्रेय मुश्रीफ यांना जातं. त्यामुळं जिल्ह्याच्या राजकारणातून मुश्रीफ यांना हटवण्यासाठी विरोधी पक्षांकडून विशेषतः भाजपकडून सातत्याने प्रयत्न झाले.
भाजपच्या दादागिरी विरोधी त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध रोखठोक भूमिका मांडणारा नेता म्हणूनही मुश्रीफ यांची ओळख आहे. राज्य सरकार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपकडून झालेल्या आरोपांना नेहमी केवळ मुश्रीफ प्रत्युत्तर देत. याचा बदला घेण्यासाठी भाजपची गँग गेल्या काही वर्षांपासून कामाला लागली होती. फडणवीस, चंद्रकांत पाटील किंवा मोदींच्या विरोधातही मुश्रीफ यांनी कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे इतर बडे नेते किंवा प्रवक्ते जितकी ठाम भूमिका मांडत नाहीत. त्यापेक्षा कितीतरी आक्रमक उत्तरं मुश्रीफ देतात. त्यामुळं भाजपकडून मुश्रीफ यांना लक्ष्य करण्यासाठी प्रयत्न होणं स्वाभाविक आहे. येत्या निवडणुकीत भाजपला कागलमधून मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगे यांना निवडणूक रिंगणात उतरवायचे आहे. सध्या शिवसेना आघाडीसोबत असल्यानं भाजपची लढाई थेट मुश्रीफ यांच्या विरोधात असणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणूनही भाजपकडून मुश्रीफ यांच्यावर आरोप केले जात आहेत.
मुश्रीफ यांना अडचणीत आणण्याची ही पहिली वेळ नाही. जिल्हा बँकेत घोटाळा प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. पण त्यातूनही त्यांची निर्दोष मुक्तता झाली होता. 2019मध्ये मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकली होता. यावेळी कागलचे घर, माद्याळ इथला साखर कारखाना, कोल्हापूरमध्ये टाकाळा परिसरात राहणाऱ्या मुश्रीफ यांच्या नालगांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले होते. तेव्हा कागलसह कोल्हापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. किरीट सोमय्या यांनी शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप मुश्रीफ यांच्यावर केला. त्यावेळी सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला.
मुश्रीफ यांच्या सेवाभांवी वृत्तीची विरोधी पक्षांनीही दखल घेतली आहे. गेल्या निवडणूकीत खुद्द चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांचं कौतुक करत जाहीर कार्यक्रमात त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण त्यावेळी शरद पवार हेच माझे गुरू आहेत, असं सांगत मुश्रीफ यांनी भाजपची ही ऑफर नाकारली होती. त्यानंतर काहीच दिवसात मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला होता. यंत्रणांचा हा गैरवापर ही भाजपची हातची खेळी आहे. या खेळीत इडी सारखी यंत्रणा पोळून निघते हे अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावरील कारवाईने स्पष्ट होऊनही या यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांना शहाणपणा येत नाही याचचं आश्चर्य वाटतं.
- प्रविण पुरो
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai