Breaking News
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीने साऱ्यांनाच अचंबित करून सोडलं आहे. राज्याच्या सत्तास्थानी कोण बसेल, मुख्यमंत्री कोण होईल आणि ज्याने हे सारं घडवलं त्याच्यावर पश्चातापाची कशी वेळ येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. करावे तसे भरावे.. हा वाक्प्रचार या ठिकाणी चपलख बसतो आहे. हा नियतीचा खेळ आहे. नियत बदलली की जसे करावे तसे भरावे. स्वत:ला राज्यात भाजपचे सर्वेसर्वा समजणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या हे संकट ओढावलं आहे. सत्तेच्या साऱ्या नाड्या आपल्या हाती असताना पश्चाताप सहन करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. सत्तेसाठी जे पेरलं तेच उगवू लागल्याचं हे चित्र आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यातलं निमित्त आहे. अर्थात केलेल्या कृत्याचं हे देणं आहे. सारे दिवस सारखे नसतात. त्यात चढ उतार ठरलेला असतो. निसर्ग नियमाचं ते चलचक्र आहे.
सरत्या आठवड्याच्या सुरुवातीला राज्यातील तमाम वर्तमानपत्रांमध्ये जाहीर झालेल्या कथित सर्वेक्षणाने फडणवीसांना चांगलाच धडा शिकवला आहे. असे असंख्य बोगस सर्वे फडणवीसांनीही करून घेतले. स्वत:ची टिमकी वाजवली तेव्हा त्यांना काहीच वाटलं नाही. आता शिंदेंनी करून घेतलेल्या सर्वेने फडणवीसांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. बाहेर आलेली आकडेवारी लक्षात घेतली तर फडणवीस यांचं राज्यातल्या राजकारणातलं महत्व पूर्वीसारखं राहीलच याची कोणी खात्री देऊ शकत नाही. सत्तेच्या स्पर्धेत आपल्याच पक्षातील जवळच्याच नेत्यांना खड्यासारखं दूर करणाऱ्या फडणवीसांप्रति पक्षात खूप काही चांगलं बोललं जातं असं नाही. ज्यांच्यावर अन्याय केला ते सगळे नेते राग ओकून होते. यात एकनाथ खडसेंना तर पक्ष सोडावा लागला. पंकजा मुंडे यांना पक्षाप्रति अविश्वासाची कायम चर्चा करावी लागते. विनोद तावडे यांना तर उमेदवारीसाठीही झटावं लागलं होतं. या सर्वांच्या मागे देवेंद्र फडणवीसांचं शुक्लकाष्ट होतं. फडणवीसांनीच त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग रोखल्याचा आरोप आजही होतो आहे. आता अडचणीत आलेल्या फडणवीसांविषयी या नेत्यांची प्रतिक्रिया चांगली असण्याचा प्रश्न नाही. आपल्या पक्षातल्याच मंडळींना जो नेता असं वागवत असेल त्या नेत्याकडून इतरांनी फारशा अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र तरीही नाईलाज म्हणून म्हणा वा पद आसक्ती म्हणा अशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, विखेपाटील, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, यांच्यासारखे असंख्य नेते फडणवीस यांच्यापुढे लालघोटेपणा करत असल्याचं लाजीरवाणं चित्र कार्यकर्त्यांना पहावं लागत आहे. सत्तेच्या राजकारणात फडणवीस यांनी स्पर्धेतल्या आपल्याच नेत्यांना इतकं हैराण केलं त्याहून कितीतरी पटीने त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना दुखावलं. या नेत्यांना आणि त्यांच्या नातलगांना आयुष्याची अद्दल घडवली. हे सगळेच नेते आणि त्यांचे पक्ष फडणवीस यांच्या नावाने बोटं मोडत असतात. समाज माध्यमांमधील प्रतिक्रिया तर खूप काही सांगून जातात. जगण्या मरण्याचा निकाल हा शास्वत असतो. तो कोणाला चुकलेला नाही. पण मरताना हा नेता खूप चांगला होता, त्याने राज्याचं आणि आपलंही कल्याण केलं अशा स्तुतीसुमनांची उधळण व्हायला हवी. किमान कमजोर असतानाही सामान्यांचा कौल आपल्याकडे असेल इतकं माप आपल्या पदरात पडेल असं माणसाने वागावं, अशी अपेक्षा असते. आज फडणवीसांची बाजू घेणाऱ्यांमध्ये वरील लाचार नेत्यांशिवाय कोणीही राहिलेलं नाही.
सत्तेची सारी शक्ती आपल्याच वाट्याला असलेल्या थाटात वावरणाऱ्या फडणवीसांना नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी बनायचं होतं. देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र असल्या उपाध्या स्वत:च बनवत फडणवीसांनी केंद्रात जाण्याचा स्वयंघोषित मार्ग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. नरेंद्रांनंतर देवेंद्रच अशी आखणी फडणवीस आणि त्यांचे फंटर गेल्या काही वर्षांपासून करत होते. यासाठी त्यांनी नरेंद्रांच्या पायाशी महाराष्ट्र ठेवला आणि मुख्यमंत्री असताना अनेक संस्था गुजरातच्या हवाली केल्या. बिनकामाचा बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याच्या माथी मारून त्यांनी कोट्यवधींच्या कर्जाच्या खायित महाराष्ट्राला लोटलं. याचं बक्षीस आपल्याला मिळेल, असं वाटत असताना नव्या समीकरणात पक्ष श्रेष्ठींनी त्यांचे पाय खेचले आणि ध्यानीमनी नसलेलं उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर आणली. शिवसेनेत उभी फूट पाडल्याचा आनंद क्षणात विरला. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी बदला घेण्याच्या भावनेतून सेनेत उभी फूट पाडली. सेना फुटली पण संपली नाही, याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. आता तर सेनेच्या फुटीसाठी ज्यांना आधार दिला तेच खांद्यावर बसून मिऱ्या वाटू लागल्याचं त्यांना पाहावं लागत आहे. राज्याचा सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री कोण हे ठरवणाऱ्या कथित सर्वेचा वापर करत एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मागे टाकल्याचं चित्र फार भूषणावहं नव्हतं. इतकी आदळआपट करत हाती भोपळा लागत असेल तर आपला मार्ग चुकतो याची खूणगाठ बांधावी. ते मान्य करण्याचा मोठेपणा फडणवीसांकडे नाही. ते आजही हवेत आहेत. सारे आपल्याच कवेत असल्याचा त्यांना भास होतो आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली त्याच क्षणी पक्षातलं आपलं महत्व कमी होत असल्याची जाणीव त्यांना व्हायला हवी होती. नैतिकतेच्या बाजारात अनैतिकता कायम विकली जाऊ शकत नाही, हे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने बजावून सांगितलं. याचे परिणाम सर्वदूर झाले. महाराष्ट्र देशातलं पुढारलेलं राज्य असताना तिथे असले बदमाशी खेळ खेळलेले कोणालाच पटले नाहीत. हे खेळ खेळत फडणवीसांनी भाजपलाच अडचणीत आणलं. कर्नाटकात दारूण पराभव झाला. जिथे प्रचारासाठी गेले तिथे पक्षाला मानहानी सोसावी लागली. तरीही पक्षात आपलंच चाललं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. हा मतलबीपणा शिंदेच्या जाहिरातीने मोडून काढला. कधी नव्हे इतकी बेईज्जती पत्करावी लागली. सलग पाच वर्षं मुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातली जनता स्वीकारायला तयार नाही, हे फडणवीसांनी पुनर्वसन केलेल्या मुख्यमंत्र्याने जाहीर करावं हे इतकं अपमानास्पद होय की याचा सोक्षमोक्ष केल्याविना कोणी सत्तेत बसला नसता. पण पदाला हापापलेल्यांना हे कोणी सांगावं? इतकं होऊनही लाज रस्त्यावर आणली जात असेल तर स्पर्धेतून आपण स्वत:ला दूर करणं चांगलं.
मोदींच्या सोबतीने आपली छबी छापण्याची शिंदे इतकी हिंम्मत करू शकतात, यावर कोणाचाच विश्वास नाही. भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय शिंदे इतक्या टोकाची भूमिका घेऊ शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदापासून मिळालेल्या बक्षीसामागे फडणवीसांमागे लागलेलं शुक्लकाष्ट कारणीभूत आहे. गैर मार्गाने सत्ता मिळवल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही शिंदेंना हात न लावण्याचा भाजप श्रेष्ठींचा इरादा हा फडणवीसांची पंख छाटण्याचाच प्रकार असल्याचं स्पष्ट दिसतं. सर्वोच्च न्यायालयाच्या या फटक्यानंतर एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करत ते फडणवीसांच्या गळ्यात टाकणं श्रेष्ठींना अशक्य नव्हतं. पण ते ज्याअर्थी झालं नाही त्याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे. करावं तसं इथेच भरावं... याची परिणती म्हणजे सुरू असलेलं राजकीय नाट्य होय.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai