Breaking News
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच राज्यातील निवडणुकीच्या तयारीची आढावा बैठक घेतली. दोन दिवस चाललेल्या या बैठकीने राज्यात निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजेल अशी चिन्हे दिसू लागली असून कदाचित लवकरच निवडणूक आयोग पत्रकार परिषदेद्वारे महाराष्ट्राचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल असे सध्याचे वारे आहे. एक महिन्यापूर्वी निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निवडणुकीचा कार्यक्रम असाच अचानकपणे जाहीर करून मोदी सरकारला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळाने त्यात थोडाफार बदल जरी करण्यात आला असला तरी निवडणूक आयोगाने दहा वर्षात प्रथमच थोडीशी तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. देशात सत्तापरिवर्तन जरी झाले नसले तरी चारशे पार म्हणणारे 240 वर अडकल्याने सर्वच स्वायत्त संस्थांनी सुस्कारा सोडला आहे. गेल्या दोन महिन्यात ईडी-सीबीआय यांचीही राजकीय वाटमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून आता त्यांनी मोर्चा खऱ्या समाजकंटकांकडे वळवल्याचे दिसत आहे. इतर राज्यांच्या निवडणूक तोंडावर आल्या तरी मोदीसरकार मागचे नियतीचे शुक्लकाष्ट कमी होतानाची चिन्हे दिसत नाहीत.
कालच गृहमंत्री अमितशहा यांनी राज्याचा दौरा करून पक्षाच्या कार्यकर्त्यात जोश भरण्याचा प्रयत्न केला. आता इतर पक्षातील मोठे मासे गळाला लागत नाही हे बघून शहा यांनी खुलेआम विरोधीपक्षांच्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा मंत्र स्थानिक नेत्यांना दिला आहे. देशाचा गृहमंत्री अशी भाषा वापरत असेल तर सार काही भयंकर आहे. पण तक्रार तरी करणार कोणाकडे. सत्ता हाच जेव्हा राजकर्त्यांचा मूळमंत्र बनतो तेव्हा अशाप्रकारचे हुकूमशाहीची वर्तन राजकर्त्यांकडून अपेक्षित असते. समजा 400 पारचा मोदींचा नारा जर प्रत्यक्षात उतरला असता तर काय? याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. परंतु, भगवान के लाठीमे आवाज नाही होता याचा थोडाफार का होईना प्रत्यय या लोकसभेच्या निवडणुकीत आला. भारतातील तळागाळाच्या लोकांनी ज्या समजदारीने मतदान केले ते पाहता येणाऱ्या सर्वच निवडणुकात त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता जास्त आहे. राहुल गांधींचे देशाच्या राजकीय क्षितिजावरील आगमन आणि दिवसेंदिवस मोदींची ढासळत असलेली प्रतिमा आणि जादू त्याचा फटका भाजपाला येत्या राज्यांच्या निवडणुकीत नक्कीच बसणार. सत्तेच्या धुंदीत राजकीय जन्मदात्याला म्हणजेच आरएसएसला डिवचण्याचा प्रयत्न मोदींच्या अंगलट आले असून त्यात जेल मधून बाहेर आल्यावर केजरीवाल यांनी तेल ओतले आहे.
केजरीवाल यांना जेलमध्ये टाकणे मोदींना बरेच महागात पडणार असे सध्या दिसत आहे. आपण कायं पुढची 25 वर्ष कायम बहुमतात राहू या धारणेत मोदी-शहा जोडगोळी राहिल्याने त्यांनी अनेक राजकीय चुका केल्या. सुरुवातीला 75 वर्षांची अट आणून अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, यशवंत सिंह यांना मार्गदर्शक मंडळात पाठवले. तोच धागा पकडून केजरीवाल यांनी मोदींच्या निवृत्तीचा चेंडू आरएसएसच्या कोर्टात टाकला. ईडी-सीबीआयचा वापर करून अनेक पक्ष फोडले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेऊन मंत्रीपदे वाटली. हे करत असताना त्यांनी देशाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केले. देशात कधी नव्हे तेवढी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक असुरक्षितता आहे. भारतीय समाज शांतता प्रिय असून त्यांना नेत्यांचा साधेपणा भावतो हेच मोदी-शहा विसरले. प्रत्येक घटनेत फायदा शोधण्याच्या नादात ते हातचे सोडून पळत्याच्या मागे लागले. आज राहुल गांधींचा साधेपणा, लोकांशी सहजपणे संवाद साधण्याची कला लोकांना भावत आहे. याच साधेपणाच्या भांडवलावर ते मोदी-शहांना थेट भिडत आहेत. सत्ता राहुल गांधी यांनी मिळवली नसली तरी सत्तेच्या समीप पोहचल्याने मोदींच्या चेहऱ्यावरील रया पार उडाली आहे.
जम्मू-काश्मीर आणि हरयाणा मध्ये भाजपचा पराभव नक्की मनाला जात आहे. लवकरच महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक आहे. महाराष्ट्रात महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेल असे वाटत नाही. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत फडणवीस यांची जागावाटपात तुला केली तसेच ते भाजपाला त्यांच्या मनासारखे होऊ देतील असे वाटत नाही. शेलार काहीही बोलत असले तरी ज्याने फडणवीसांनाच मामा बनवले त्या शेलारांचा मामा करायला शिंदेंना किती वेळ लागेल. लोकसभा निवडणुकीत मोदी, शहा, फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्या सभा होऊनही राज्याने भाजपाला नाकारले हे सत्य आहे. त्यामुळे शिंदे-पवार यांच्या शिवाय भाजप निवडणूक लढवूच शकत नाही किंबहुना भाजपाकडे तेव्हढे उमेदवाराचं नसतील. शिंदेंची मदार लाडकी बहीण योजनेवर आहे. पण लाडकी बहीण योजना आली आणि कोकणात महाराजांचा पुतळा पडला. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही.
नुकतेच मुंबई सेनेटच्या निवडणुकांचेही निकाल लागले. त्यात भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने युवा सेनेकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करला. ज्या मुंबईवर भाजपाची दारोमदार आहे त्या मुंबईतील सुशिक्षित युवकांनी आदित्य ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीत सर्वच आलबेल नसले तरी भाजप हटाव हे ध्येय असल्याने फारसे कोणीच ताणून धरेल असे वाटत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपपुढे अपशकुनांची शृंखलाच उभी आहे. हरयाणा-जम्मू काश्मीर राज्यांचे निकाल विरोधी गेल्यास भाजपलाही बंडखोरीचा सामना इतर राज्यात करावा लागेल. जे घाबरून किंवा सत्तेच्या लालसेने भाजपात गेले होते ते निश्चितच परतीचा प्रवास सुरु करतील. महाराष्ट्रात याची शक्यता खूप मोठी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून येऊन भाजपात आमदार झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. अजित पवारांनाही सध्या पच्छाताप झाल्याचे त्यांच्या अलीकडच्या वक्तव्यावरून दिसत आहे. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीनंतर झालेले राजकीय नाट्य पुन्हा घडेल याची काही शाश्वती नाही. फडणवीसांची प्रतिमा सत्तासंघर्षाच्या आणि फोडाफोडीच्या नाट्यामुळे खूप मालिन झालेली आहे. त्यामुळे ते जेवढा प्रचार करतील तेवढा तो भाजपासाठी नकारात्मक असेल असा एक मतप्रवाह आहे. मग राज्याच्या निवडणुकीत कोणाच्या हातात सूत्रे द्यावीत हाही यक्ष प्रश्न भाजापुढे राहील. महाविकास आघाडीने निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठरवू पण पहिले भाजपाला घालवू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्याची निवडणूक खूपच आव्हानात्मक असून कदाचित या निवडणुकीनंतर मोदी सरकारचे भविष्यही बदलेले असेल. जनता महायुतीला सत्तेत बसवते कि मी पुन्हा येईन म्हणण्यासाठी विरोधी बाकावर बसवते ते काळावर सोडूया....
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
संजयकुमार सुर्वे