Breaking News
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज 134 वी जयंती ( 22 सफ्टेंबर ) कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार आणि कार्याचे चिंतन होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या भूमीला वेगळा आणि प्रगतशील इतिहास आहे. कोणी त्याला संतांची भूमी म्हणून गौरवतात तर कोणी त्यास सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीकारांची भूमी म्हणून ओळखतात. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्याला पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून ओळखले जाते. कोणत्याही विकास कार्यासाठी सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाची आवश्यकता असते आणि त्यासाठी वैचारिक क्रांती घडावी लागते. अशाच वैचारिक क्रांतीसाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे थोर पुरुष जन्माला यावे लागतात.
महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीतीसाठी शिक्षणाचे सार्वत्रिकीरण होऊन शिक्षणपद्धतीचे सामाजिकीकरण कसे होईल याचा विचार अण्णांनी केला. समाजातील सर्व स्तरातील लोकांना शिक्षण कसे उपलब्ध होईल याचा विचार करत असतानाच ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांना शिक्षणाची समान संधी आणि सामूहिक शिक्षण व्यवस्थेची उभारणी कर्मवीर अण्णांनी सर्व जाती धर्मातील मुलांना वसतीगृहे उभारुन केली. कर्मवीर अण्णा हे महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे सच्चे कार्यकर्ते होते. स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातील रयतेची फारच बिकट परिस्थिती होती. कर्मवीर अण्णांनी सर्वसामान्यांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन प्रत्यक्षात शैक्षणिक क्रांती व सामाजिक क्रांती घडवून आणली. 25 सप्टेंबर 1919 रोजी सत्यशोधक समाजाची परिषद कराड येथील काले या गावी आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा ठराव मांडला आणि 4 ऑक्टोबर 1919 रोजी प्रथम काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. रयत शिक्षण संस्थेत भाऊरावांनी सुरुवातीला मिश्र वसतिगृहाची निर्मिती केली. त्याकाळी विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वेगळी वसतिगृहे असत. भाऊरावांनी मात्र सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना एकच वसतिगृह उभारुन सामाजिक व जातीधर्मातील भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी देखील झाला.
भाऊरावांनी त्याकाळी लोकजागृतीचे काम करीत असताना आधुनिक शेतीचे महत्त्व समाजाला पटवून दिले. शिवाय शेतीसाठी आधुनिक अवजारांचे महत्व त्यांनी पटवून सांगितले. किर्लोस्कर आणि धनजी कुपर या दोन उद्योगपतींनी त्यांच्या कारखान्यात भाऊरावांच्या सहकार्याने लोखंडी नांगराची निर्मिती केली व उद्योगाची भरभराट घडवून आणली. मात्र उद्योगातून मिळणार्या नफ्यातील काही हिस्सा समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणासाठी वापरु, असे दिलेले आश्वासन दोन्हीही उद्योगपतींनी पाळले नाही म्हणून भाऊराव निराश व हताश झाले नाहीत. छ. शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड या संस्थानिकांनी कर्मवीरांना भरीव स्वरूपाचे सहकार्य केले. भाऊराव बंडखोर होते. कशालाच ते घाबरत नसत. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अन्याय करणारा मग तो कितीही मोठा असो ते त्याच्या विरुद्ध पेटून उठत. स्वातंत्र्य लढयात ते महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित झाले होते. भाऊरावांनी 1924 साली रयत शिक्षण संस्थेचे स्थलांतर सातारा येथे केले व मिश्र वसतिगृहाची स्थापना केली. मात्र संस्थेची स्वत:ची अशी शाळा नव्हती. मुले आजूबाजूच्या शाळेत शिक्षण घेत होती. प्राथमिक शिक्षण हाच कोणत्याही देशाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीचा पाया असतो. हे अण्णांना माहित होते, तसेच हे शिक्षण केवळ समाजातील मूठभर लोकांना नसून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तसेच यासाठी शिक्षक बहुजन समाजातूनच निर्माण झाले पाहिजेत म्हणून भाऊराव पाटील यांनी 1935 साली सिल्व्हर ज्यूबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज या नावाने प्राथमिक शिक्षकांसाठी अध्यापक विद्यालय काढले. त्यानंतरच सातारा जिह्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक शाळा उघडण्याचे कार्य हाती घेतले गेले.
कर्मवीर अण्णांनी खेडोपाड्यात आणि दर्याखोर्यात प्राथमिक शाळा सुरु केल्या. माध्यमिक शाळांची सोय मात्र शहरातच होती आणि ग्रामीण भागातील लोकांची माध्यमिक शिक्षणासाठी आपली मुले शहरात ठेवण्याची सोय नव्हती. त्यासाठी भाऊरावांनी माध्यमिक विद्यालय फ्री ऍण्ड रेसिडेंशियल स्कूल नावाने चालू केले. फ्री ऍन्ड रेसिडेंन्शियल म्हणजे शिक्षण आणि राहणं पूर्णपणे मोफत होते. त्यासाठी मुलांना शेतात काम करावे लागणार होते. भाऊरावांनी श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, कमवा आणि शिका यांचे संस्कार देण्याचे कार्य या शिक्षण प्रयोगातून साध्य केले. कमवा आणि शिका या प्रकारचे पहिले फ्री ऍन्ड रेसिडेन्शियल स्कूल सातारा येथील धनिणीच्या बागेत सुरु झाले. तर 1940 साली सातारा येथे स्थापन झालेले महाराजा सयाजीराव हायस्कूल हे संस्थेचे पहिले हायस्कूल आहे. या हायस्कूलमधून इंग्रजी विषय शिकविण्यास पहिल्यांदा सुरुवात झाली.
भाऊरावांना महात्मा गांधी बद्दल प्रचंड आदर होता. 1920 च्या सुमारास स्वदेशी वस्तूचा वापर आणि खादीचा प्रचार करण्यासाठी महात्मा गांधीनी मुंबईत सभा घेतली होती. त्यावेळी भाऊराव मोठया रूबाबात कोट, बूट घालून त्या सभेला हजर होते. परंतु या सभेत म. गांधीनी परदेशी कपड्यांची होळी करण्याची हाक दिल्यानंतर, भाऊरावांनी आपल्या अंगावरची परदेशी कपडे त्या होळीत टाकून दिली. त्यावेळी भाऊरावांनी शपथ घेतली की, मी आजन्म खादी वापरेन. भाऊरावांनी प्राण असेपर्यत ही शपथ मोडली नाही. कर्मवीरांच्या श्रध्दा किती शुद्ध, सात्त्विक आणि धारदार होत्या याची प्रचिती येते. भाऊरावांच्या निष्ठा प्रखर होत्या. महाविद्यालयाच्या स्थापनेसाठीच्या निधीची अडचण आल्यावर एका धनिक गृहस्थाने महाविद्यालयाचे शिवाजी महाराजांचे नाव बदलून, मी सांगेल त्या व्यक्तीचे नाव देण्याच्या अटीवर लागेल तेवढा निधी देण्याची तयारी दर्शवली. मात्र भाऊरावांनी त्या धनिक गृहस्थास ठणकावून सांगितले की, मी एकवेळ माझ्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही. भाऊरावांनी अठरा पगड जातीच्या स्पृश्या-अस्पृश्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी श्रमप्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचे धडे देणारे शिक्षण देण्यावर भर दिला. स्वत: कष्ट करुन, घाम गाळून शिक्षण घेण्यावरच त्यांचा अधिक कटाक्ष होता. अशा या महाराष्ट्राच्या आधुनिक भगीरथाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
प्रा.चंद्रशेखर भोसले (उपप्राचार्य), कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,वाशी
.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai